‘एआई’ सेंटर्स ऑफ एक्सलेन्ससाठी माहाराष्ट्र शासन-मायक्रोसॉफ्ट सामंजस्य करार
मुंबई :- महाराष्ट्र राज्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) उत्कृष्टता केंद्रे स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाला आहे. हा करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
सामंजस्य करारावर महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि मायक्रोसॉफ्टचे वेंकट कृष्णन यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, तसेच मायक्रोसॉफ्टचे विक्रम काळे आणि विशाल घोष आदी मान्यवर उपस्थित होते.
तीन ठिकाणी ‘एआय’ उत्कृष्टता केंद्रे स्थापन
या सामंजस्य करारानुसार महाराष्ट्र राज्यात तीन उत्कृष्टता केंद्रे स्थापन केली जाणार आहेत:
- मुंबई – भूगोल विश्लेषण केंद्र: GIS आणि उपग्रह इमेजरीच्या साहाय्याने शासनाच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेस सहाय्य.
- पुणे – न्यायवैज्ञानिक संशोधन आणि ‘एआय’ केंद्र: गुन्हे तपास आणि न्यायवैज्ञानिक विश्लेषणासाठी एआयचा उपयोग वाढविणे.
- नागपूर – मार्व्हेल केंद्र: कायद्यांची अंमलबजावणी, दक्षता आणि प्रशासनासाठी ‘एआय’ आधारित संशोधन व प्रशिक्षण.
‘कोपायलट’ तंत्रज्ञानामुळे प्रशासनात सुधारणा
मायक्रोसॉफ्ट कोपायलट (Copilot) तंत्रज्ञानाच्या मदतीने शासनाच्या विविध कार्यप्रणालींमध्ये सुधारणा केली जाणार आहे. यात:
- प्रशासनिक कार्यप्रवाह अधिक सुव्यवस्थित करणे
- दस्तऐवज व्यवस्थापनासाठी स्वयंचलित संक्षेपण व विश्लेषण सुविधा
- नागरिकांच्या तक्रारींचे जलद निराकरण
- आरोग्य व्यवस्थापन, जमीन अभिलेख आणि वाहतूक व्यवस्थापन सुधारणा
सामंजस्य कराराचे प्रमुख फायदे
- प्रशासन अधिक कार्यक्षम व पारदर्शक होईल.
- शासकीय कर्मचाऱ्यांना एआय प्रशिक्षण व प्रमाणपत्रे मिळणार.
- महाराष्ट्रातील IT आणि AI क्षेत्रात अधिक रोजगार निर्मिती.
- नागरिकांना जलद व प्रभावी सेवा मिळणार.
- वाहतूक व्यवस्थापन आणि दंड प्रणाली अधिक सुलभ होणार.
या भागीदारीमुळे महाराष्ट्र डिजिटल प्रशासनाच्या दिशेने देशात आघाडीवर राहील आणि जागतिक स्तरावर नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या केंद्रबिंदू म्हणून उभे राहील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.