जलचळवळ ही जनचळवळ व्हावी – इंजी. हरिष मोहोड
अमरावती :- “सद्यस्थितीत सर्वदूर पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असून भविष्यात पाणी वाचविले नाही, तर माणसाप्रमाणेच पृथ्वीवरील जल जीवही धोक्यात येऊ शकतात,” असा इशारा संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार मंडळाचे सदस्य इंजी. हरिष मोहोड यांनी दिला.
ते संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या एम. ए. आजीवन अध्ययन व विस्तार या अभ्यासक्रमाच्या वतीने आंतरराष्ट्रीय जल दिनानिमित्त आयोजित एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्राचे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या कार्यक्रमात विद्यापीठाच्या आयक्युएसीचे संचालक डॉ. संदीप वाघुळे, सिंदखेड येथील सरपंच प्रवीण कदम, विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
पाण्याच्या टंचाईबाबत गंभीर इशारा
इंजी. मोहोड पुढे म्हणाले, “भारताच्या विविध प्रांतात आताच पाण्याची भयावह परिस्थिती आहे. राजस्थान आणि मारवाडसारख्या भागात पाण्याच्या अभावामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. याचा परिणाम शेतीवरही होत असून, पुढील काही वर्षांत परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते.” वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने जलसंधारण महत्त्वाचे असून, प्रत्येकाने पाण्याचा वापर काळजीपूर्वक करावा, असे त्यांनी आवाहन केले.
निसर्गातील जलचक्राचा समतोल राखण्याची गरज – डॉ. संदीप वाघुळे
कार्यशाळेच्या अध्यक्षीय भाषणात डॉ. संदीप वाघुळे म्हणाले, “निसर्गाची अनमोल देण म्हणजे पाणी आणि म्हणूनच पाण्याला जीवन म्हटले जाते. त्याचा अनावश्यक वापर झाल्यास निसर्गचक्र बिघडेल. पर्यावरण आणि जलचक्र परस्परांशी जोडलेले असल्याने पाण्याची बचत करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.” कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पाणी बचाव मोहिमेत सहभागी होऊन समाजजागृती करावी, अशी अपेक्षा विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील यांनी व्यक्त केली.
कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. वैभव जिसकार यांनी केले, तर आभार प्रा. राहुल दोळके यांनी मानले. या कार्यशाळेला इतिहास अभ्यासक, संशोधक, जलसंधारण क्षेत्रातील कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.