संस्कृत ऑलिम्पियाड परीक्षेत विद्यापीठाच्या दोन प्राध्यापकांचा गौरव कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले अभिनंदन
अमरावती :- दिल्ली येथील केंद्रीय संस्कृत विद्यापीठातर्फे आयोजित ‘संस्कृत ऑलिम्पियाड’ या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या संस्कृत विभागाच्या प्रा. प्रियंका गावंडे आणि प्रा. श्वेता बडगुजर यांनी विशेष यश संपादन केले आहे.
प्रा. प्रियंका गावंडे यांनी सामाजिक सरल स्तरात प्रथम क्रमांक पटकावला, तर प्रा. श्वेता बडगुजर यांनी सामाजिक प्रगत स्तरात तृतीय स्थान मिळवले. या परीक्षेत देशभरातून सुमारे ५,००० विद्यार्थी सहभागी झाले होते.
हरीद्वारमध्ये पुरस्कार वितरण सोहळा
केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, दिल्ली आणि पतंजली विद्यापीठ, हरीद्वार यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय शास्त्रोत्सव कार्यक्रम हरीद्वार येथे संपन्न झाला. या सोहळ्यात प्रथम पारितोषिक विजेत्या प्रा. प्रियंका गावंडे यांना रु. ११,००० रोख रक्कम, प्रमाणपत्र, मानचिन्ह आणि पुस्तके प्रदान करण्यात आली. तसेच, तृतीय पारितोषिक विजेत्या प्रा. श्वेता बडगुजर यांना रु. ५,००० रोख रक्कम, प्रमाणपत्र, मानचिन्ह व पुस्तके देऊन गौरविण्यात आले.
या पुरस्कारांचे वितरण केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी आणि पतंजली विद्यापीठाचे कुलगुरू श्री बाळकृष्ण स्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी श्री सोमनाथ संस्कृत विद्यापीठ, गुजरातचे कुलगुरू प्रो. सुकांत कुमार सेनापती यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
विद्यापीठाकडून प्राध्यापकांचे अभिनंदन
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे आणि संस्कृत विभागाच्या समन्वयक डॉ. संयोगिता देशमुख यांनी पुरस्कारप्राप्त प्रा. प्रियंका गावंडे व प्रा. श्वेता बडगुजर यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.