Crime News : नागपुरात सराफाच्या दुकानावर सशस्त्र दरोडा; १ कोटी १५ लाखांचा ऐवज लंपास

नागपूर :- नागपूरच्या पिंपळा भागात बुधवारी रात्री एका सराफाच्या दुकानावर सशस्त्र दरोडा पडल्याची धक्कादायक घटना घडली. दरोडेखोरांनी दुकान बंद करून घरी जाणाऱ्या व्यापाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवत १ किलो सोने, १५ किलो चांदी आणि त्याची कार लुटून पळ काढला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
गोळीबार करत व्यापाऱ्याला लुटले
पिंपळा मार्गावरील निहारिका ज्वेलर्स या सराफा दुकानाचे मालक रवी मुसळे आणि त्यांचा पुतण्या रात्री काम संपवून घरी जाण्यासाठी निघाले होते. दुकान बंद करून ते कारमध्ये दागिन्यांची पेटी ठेवत असतानाच दरोडेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. सुरुवातीला त्यांनी हवेत दोन गोळ्या झाडल्या, त्यानंतर रवी मुसळे यांच्या पुतण्याच्या डोक्याला बंदूक लावत त्याला कारमधून बाहेर काढले. दरोडेखोरांनी दागिन्यांची पेटी आणि कार घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.
१ कोटी १५ लाखांचा ऐवज लंपा
सया दरोड्यात दरोडेखोरांनी तब्बल १ कोटी १५ लाख रुपयांचा ऐवज लुटला. त्यामध्ये १ किलो सोने आणि १५ किलो चांदीचा समावेश आहे. व्यापाऱ्यांवर झालेल्या या धक्कादायक घटनेमुळे नागपूरमधील सराफा व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पोलिसांचा तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. दरोडेखोर कोण होते, त्यांनी कुठून रेकी केली आणि कोठे पळून गेले, याचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासणी केली जात आहे. पोलिसांनी शहरभर नाकाबंदी केली असून, लवकरच आरोपींना अटक केली जाईल, असा दावा पोलिसांनी केला आहे.
या घटनेमुळे नागपूर शहरातील व्यापार्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. व्यापाऱ्यांनी आपल्या सुरक्षेसाठी अतिरिक्त उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
संपूर्ण तपास आणि आरोपींच्या अटकेसाठी नागपूर पोलिसांकडून विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे.