Farmer Suicide : अकोला कर्ज आणि नापिकीमुळे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या, शेरवाडी गावात हळहळ

अकोला :- कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे आणखी एका शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले आहे. अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील शेरवाडी गावातील 32 वर्षीय युवक विवेक बाबाराव ढाकरे यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नापिकी आणि कर्जाच्या ओझ्याने विवेकने घेतला टोकाचा निर्णय
विवेक ढाकरे यांच्याकडे वडिलोपार्जित 11 एकर शेती होती. मात्र, सततच्या नापिकीमुळे आणि शेतीच्या वाढत्या खर्चामुळे त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढावले होते. त्यांच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झाले होते, त्यामुळे संपूर्ण शेती आणि घराची जबाबदारी विवेक यांच्यावर होती. आईसोबत राहत असलेल्या विवेक यांनी शेतीसाठी घेतलेल्या कर्जाच्या ओझ्याने त्रस्त होऊन अखेर घरातच कीटकनाशक प्राशन करून आपले जीवन संपवले.
गावात शोककळा, शासनाने मदत द्यावी अशी ग्रामस्थांची मागणी
शेतकरी युवकाच्या या आत्महत्येमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकरी संघटनांनी शासनाने या प्रकरणाची दखल घ्यावी आणि विवेक यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. प्रशासनाने त्वरित मदत जाहीर करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
शेतकरी आत्महत्यांचे थांबणार आहे का सत्र?
राज्यात आणि विशेषतः विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. नापिकी, वाढती महागाई, कर्जाचा भार आणि शासनाच्या अपुऱ्या मदतीमुळे शेतकरी हताश होत आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी संघटनांकडून केली जात आहे.