Farmer Suicide : विदर्भात पुन्हा शेतकऱ्याची आत्महत्या – दोन लेकरांचे स्वप्न उध्वस्त!

अकोला, मूर्तिजापूर :- विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. मूर्तिजापूर तालुक्यातील रसुलपूर गावात ३५ वर्षीय युवा शेतकऱ्याने कर्जाच्या विळख्यात अडकून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चार महिन्यांपूर्वी पत्नीला कर्करोगामुळे गमावलेल्या या शेतकऱ्याने जगण्याच्या संघर्षात हार मानली आणि दोन चिमुकल्या मुलांना पोरकं करून गेला.
कर्जाच्या ओझ्याखाली दडलेलं आयुष्य
योगेश हरणे (३५) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून, त्याने विष प्राशन करून आपले जीवन संपवले. पत्नीच्या मृत्यूनंतर त्याच्यावर संपूर्ण घराची जबाबदारी होती. कर्ज, नापिकी आणि वाढत्या उत्पादन खर्चाने त्याच्या परिस्थितीचा ताण आणखी वाढत गेला. शेतीमध्ये वारंवार होणारे नुकसान, बोगस बियाणे आणि बाजारातील अस्थिरता यामुळे त्याला शेवटी आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागला.
कुटुंबाचा आक्रोश
- मृतकाच्या कुटुंबीयांनी सरकारच्या धोरणांवर संताप व्यक्त केला आहे.
- घनश्याम हरणे (मृतकाचा भाऊ) म्हणाले, “भाऊ लढत होता… पण त्याला कोणीही मदत केली नाही! त्याच्या मुलांचं आता काय?”
- राजू शेट्टी (शेतकरी नेते) यांनी प्रतिक्रिया देताना सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, “शेतकऱ्यांना पिकवण्यासाठी जगावं लागतं, आणि सरकार त्यांच्या जगण्याचीच काळजी घेत नाही. हा खून आहे, आत्महत्या नाही!”
शासनाच्या घोषणांचे काय झाले?
शेतकऱ्यांसाठी सरकार वेळोवेळी विविध योजना जाहीर करते, मात्र त्या योजनांचा फायदा नेमका कोणाला होतो, याचा प्रश्न उपस्थित होत आहे. कर्जमाफीच्या घोषणा हवेत विरत असताना, आणखी किती बळी जाणार? विदर्भातील यवतमाळ आणि अमरावती भागातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
सरकारची जबाबदारी आणि अपेक्षा
विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. कर्जमाफी आणि मदतीच्या घोषणा केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात अंमलात आणल्या पाहिजेत. शेतकऱ्यांना बाजारपेठेत योग्य दर मिळावा, शेतीसाठी सुलभ कर्जपुरवठा होावा आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी तातडीची मदत मिळावी, या बाबी शासनाने प्राधान्याने पाहाव्यात.
शासन आता तरी जागं होणार का?
आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांचे प्राण गेले, मात्र सरकारचे धोरण केवळ कागदावरच राहिले आहे. पीडित शेतकऱ्यांच्या घरी जाऊन फोटोसेशन करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आली आहे. विदर्भातील शेतकऱ्यांचे जीवन वाचवण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
सिटी न्यूजच्या पुढील अपडेटसाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या आणि अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा!