प्रहार पक्षाच्या आंदोलनाला यश! अमरावतीत आकांक्षी सुलभ शौचालयांसाठी निविदा प्रक्रिया सुरू

अमरावती: अमरावती शहरातील आकांक्षी सुलभ शौचालय योजना, जी गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होती, तिला अखेर प्रशासनाकडून न्याय मिळताना दिसत आहे. प्रहार जनशक्ती पक्षाच्या आंदोलनानंतर मनपा प्रशासनाने ही योजना पुन्हा ऐरणीवर आणली असून, शौचालय स्वच्छतेसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.
प्रहार पक्षाचे महानगर प्रमुख बंटी रामटेके, वसू महाराज, गोलू पाटील आणि इतर कार्यकर्त्यांनी गेल्या काही दिवसांत शहरातील दुर्लक्षित शौचालयांच्या दयनीय अवस्थेविरोधात आंदोलन छेडले होते. जिल्हाधिकारी कार्यालय चौकात असलेल्या कुलूपबंद शौचालयाचे कुलूप फोडून स्वच्छता मोहिम राबवण्यात आली होती.
प्रहारच्या दबावानंतर, मनपा प्रशासनाने या योजनेची गंभीर दखल घेत शौचालय स्वच्छतेसाठी निविदा काढली आहे. यामुळे अमरावतीत सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे. ही योजना केवळ आरोग्याशी नाही तर सामान्य नागरिकांच्या सन्मानाशीही जोडलेली आहे.
प्रहारच्या कार्यकर्त्यांनी यशस्वी आंदोलनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जल्लोष साजरा केला. फटाक्यांची आतिषबाजी, पेढे वाटप, घोषणांनी परिसर दुमदुमला. कार्यकर्त्यांनी मनपाचे आभार मानत स्वच्छ अमरावतीसाठी लढा सुरूच राहील असा निर्धार केला.