गुटखा किंग विक्की मंगलानीच्या दुकानात गोळीबार, तिघांना अटक

अमरावती: अमरावती शहरात खळबळ उडवणारी थरारक घटना! जयस्थंभ चौक ते कॉटन मार्केट मार्गावर – जय भोले गुटखा दुकानात तीन जणांनी नशेत धिंगाणा घालत गोळीबार केल्याची घटना घडली. पोलीस तपासातून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत.
शनिवारी रात्री उशिरा, इंद्रपुरी हॉटेलसमोर असलेल्या जय भोले गुटखा दुकानात तीन युवकांनी नशेत येत जबरदस्त धिंगाणा घातला. दुकानात घुसून साहित्याची तोडफोड केली आणि त्यानंतर फर्निचरवर गोळी झाडली. घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. ही माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी आणि DCP गणेश शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी करून आरोपींचा शोध सुरू केला. मुंबईला रेल्वेने पलायन करण्याच्या तयारीत असलेले तिघे आरोपी अखेर अटकेत आले. मोहम्मद आसिफ नूर मोहम्मद (वय 26, बडनेरा), अंकुश राजेंद्र शेंडे (वय 27, चांदूर रेल्वे) , अब्दुल शकील अब्दुल सत्तार (वय 42, टांगापुरा, चांदूर रेल्वे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात “गुटखा किंग” विक्की मंगलानीचा पत्ता लावण्यासाठी आरोपींनी चौकशी केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र आश्चर्य म्हणजे, विक्की मंगलानीने अद्याप तक्रार दाखल केलेली नाही.
पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट केलं की विक्कीच्या तक्रारीनंतरच पूर्ण सत्य बाहेर येईल. अमरावतीत दोन गुटखा विक्रेत्यांचे गट सक्रिय असून, हप्ता न मिळाल्यामुळे हा हल्ला घडवण्यात आला.
अशा प्रकारे अमरावती शहरात गुटखा माफियांचे वाढते वर्चस्व, आणि त्या मागे असलेला राजकीय किंवा पोलीस संरक्षणाचा भाग – हे गंभीर प्रश्न उपस्थित करतोय. आता पोलिसांच्या तपासातून कोण मास्टरमाइंड समोर येणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.