जयभोले केंद्रावर फायरिंग | गुटखा किंग विक्कीवर हल्ला

अमरावती: अमरावती शहराच्या मध्यवर्ती भागात शुक्रवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. ‘गुटखा किंग’ विक्की यांच्या जयभोले केंद्रावर तिघा अज्ञात हल्लेखोरांनी फायरिंग करत दहशत माजवली. ही घटना बालाजी मंदिर परिसरात घडल्याने संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
प्राथमिक माहितीनुसार, रात्री उशिरा तीन हल्लेखोर दुचाकीवरून आले आणि त्यांनी सर्वप्रथम दुकानाच्या काचा फोडल्या. त्यानंतर हवेत गोळ्या झाडत विक्कीचा पत्ता विचारत धमकी दिली. देशी कट्ट्याचा वापर करून फायरिंग करण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जखम किंवा जीवितहानी झाली नाही.
घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून दुचाकीवरून फरार झाले. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिसरात नाकाबंदी करत तपास सुरू केला. DCP गणेश शिंदे स्वतः घटनास्थळी पोहोचले आणि संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला. फायरिंगनंतर परिसरात नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली असून, स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण आहे. पोलिसांनी बंदोबस्त वाढवून परिसरात गस्त सुरू केली आहे.