ज्येष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचं निधन, प्रदीर्घ आजाराने मालवली प्राणज्योत

‘वादळवाट’ ,’चार दिवस सासूचे’,’दामिनी’ सारख्या मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडणारे ज्येष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे निधन झाले आहे. या दुःखद बातमीने मराठी सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.
डॉ. विलास उजवणे यांनी शुक्रवारी दुपारी अखेरचा श्वास घेतला. ब्रेन स्ट्रोक, हृदय विकारासंबंधी गेले काही वर्षे ते आजारी होते. आजारपण आणि काम नसल्याने उपचारासाठी लागणारा खर्च कसा करावा हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा होता. अशातच जवळच्या मित्रांनी सोशल मीडियावर मदतीचे आवाहन केले होते तेव्हा लोकांना ही बातमी कळताच हळहळ व्यक्त करण्यात आली होती.
डॉ विलास उजवणे यांच्या पत्नी उज्वला उजवणे याही अभिनेत्री आहेत. नवऱ्याचे आजारपण सांभाळत जमेल तसे त्याही कलाक्षेत्रात काम करत राहिल्या. दामिनी, वादळवाट अशा अनेक मालिका तसेच चित्रपटातून डॉ विलास उजवणे यांनी दमदार अभिनय केला होता. आज त्यांच्या निधनाच्या बातमीने मराठी सृष्टीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
4 एप्रिल 2025 रोजी मीरारोड याठिकाणी असणाऱ्या एका खासजी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. उजवणे यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.उजवणे यांनी मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टात देखील स्वतःची वेगळी छाप पाडली.
आर्थिक मदतीचे केले आवाहन
डॉ. विलास उजवणे यांना ब्रेन स्ट्रोकचा त्रास जाणवू लागला. यामुळे त्यांचे आरोग्य आणखी बिघडले. या दरम्यान त्यांना हृदयाचा देखील त्रास होऊ लागला. या दरम्यान त्यांची आर्थिक स्थिती देखील बिघडू लागली. या दरम्यान २०२२ मध्ये डॉ. विलास उजवणे यांच्या मित्राने आर्थिक मदतीचे आवाहन केले होते.