नागपूरमध्ये एटीएम फोडून ७.५८ लाखांची रोकड लंपास!

नागपूर: नागपूर शहरातील जरीपटका मार्गावर आज (शनिवारी) पहाटेच्या सुमारास धक्कादायक चोरीची घटना घडली. चोरट्यांनी थेट पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएममध्ये घुसून कॅश पेटीच लांबवली. या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे.
आज पहाटे चार ते पाच वाजेदरम्यान, तीन अज्ञात चोरटे चेहऱ्यावर मास्क घालून आणि हातात औजारं घेऊन पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएममध्ये घुसले. त्यांनी एटीएम मशीन फोडून त्यातील ₹7,58,000 ची रोकड असलेली कॅश पेटी लंपास केली.
घटनास्थळावरून चोरटे काही क्षणांतच पसार झाले. याचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, फुटेजच्या आधारे पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
पोलीस तपास सुरु, विशेष पथकाची नियुक्ती
नागपूर पोलीस उपायुक्त राहुल मदणे यांनी सिटी न्यूजशी बोलताना सांगितले की, “ही घटना अत्यंत गंभीर आहे. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले असून, लवकरच आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे.”
शहरात खळबळ, बँकिंग सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
या घटनेमुळे नागपूर शहरात खळबळ उडाली आहे. बँकिंग सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं असून, नागपूरसारख्या मोठ्या शहरात अशा प्रकारे पहाटेच्या वेळेस एटीएम फोडून लाखोंची रोकड चोरीला जाणं, ही चिंताजनक बाब मानली जात आहे.
संपूर्ण नागपूरचे लक्ष पोलिसांच्या तपासाकडे
सध्या संपूर्ण नागपूरचे लक्ष पोलिसांच्या तपासावर लागलेले आहे. आरोपी लवकरात लवकर गजाआड होणार का, आणि बँकेची रोकड परत मिळणार का – हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.