नितीन देशमुखांचा संताप अकोट अट्रॉसिटी प्रकरण हे राजकीय षड्यंत्र
अकोट: अकोटमध्ये एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे, जिथे प्रशासन आणि शिवसेना ऊबाठा यांच्यात टोकाचा संघर्ष निर्माण झाला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र इंगळे यांनी शिवसेना ऊबाठाचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. ही तक्रार पोलिसात दाखल झाल्यानंतर अॅट्रॉसिटी कायद्यासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आता राजकीय हस्तक्षेपही झाला असून, शिवसेना ऊबाठाचे आमदार नितीन देशमुख यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण
देशमुख म्हणाले, “गोपाल दातकर यांनी कुठलीही जातीय भावना दुखावणारी भाषा वापरलेली नाही. ते केवळ जनतेच्या प्रश्नांवर अधिकार्याशी बोलत होते. ही तक्रार म्हणजे निव्वळ राजकीय षड्यंत्र आहे.” तसेच, आमदारांनी असा दावाही केला की या अधिकाऱ्याविरुद्ध पूर्वी दोन महिलांनीही गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते, त्यामुळे त्याचे तात्काळ निलंबन करण्यात यावे. देशमुखांनी अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यास ‘शिवसेना स्टाईलने’ आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.
अकोटमधील ही वादग्रस्त घटना केवळ प्रशासनिक नसून, ती राजकीय रंग घेत असल्याचं चित्र आहे. आता प्रशासन या प्रकरणावर काय निर्णय घेते आणि शिवसेना ऊबाठाचं पुढचं पाऊल काय असेल, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे.