महाअष्टमी विशेष : अंबादेवी मंदिरात सामूहिक रामरक्षा पठण

अमरावती : चैत्र नवरात्रोत्सवाच्या महाअष्टमी निमित्त अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात आज भक्तीचा अनोखा जल्लोष अनुभवायला मिळाला. शहराच्या मध्यवर्ती असलेल्या अंबादेवी मंदिरात सकाळी पारंपरिक पद्धतीने सामूहिक रामरक्षा स्तोत्र पठण करण्यात आलं. ८० हून अधिक भक्तांनी या पठणात सहभागी होत संपूर्ण मंदिर परिसरात भक्तिरस निर्माण केला.
यानिमित्ताने मंदिराची विद्युत रोशनाई अत्यंत आकर्षक पद्धतीने सजवण्यात आली होती. दोन्ही कळस, यात्री निवास, व प्रवेशद्वार रंगीबेरंगी प्रकाशयोजनेने उजळून निघाले होते.
यासोबतच अष्टमीच्या दिवशी पारंपरिक पद्धतीने होम-हवन विधी संपन्न झाला. दुर्गा सप्तशती पठणात महिला भक्तांचा देखील उत्स्फूर्त सहभाग होता.
मंदिर प्रशासनाने स्वच्छता व सुरक्षा यावर विशेष भर दिला होता. या भक्तिमय आणि सांस्कृतिक कार्यक्रमामुळे मंदिर परिसरात एकता, श्रद्धा आणि सकारात्मकतेचं वातावरण निर्माण झालं.