मिटकरींची सडकून टीका! सपकाळ ‘नवेली दुल्हन’, शेट्टी ‘आऊटडेटेड वर्जन
राजकारणात टीका ही अपेक्षित असते, मात्र तिचा दर्जा कुठवर खाली जाऊ शकतो, याचं एक ताजं आणि वादग्रस्त उदाहरण आज समोर आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार अमोल मिटकरी यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यावर सडकून टीका करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
वक्स बोर्डच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादात काँग्रेसची भूमिका फोल असल्याचं मत मांडत, आमदार मिटकरी यांनी सपकाळ यांना लक्ष्य केलं.
मिटकरी म्हणाले, “हर्षवर्धन सपकाळ हे ‘नवी नवेली दुल्हन’ आहेत, अजित पवारांवर बोलण्याइतकी त्यांची उंची नाही,” असा सणसणीत टोला त्यांनी लगावला. तसंच “फडफडणारा दिवा लवकर विझतो” अशा उपमा वापरत त्यांनी सपकाळ यांचं राजकीय अस्तित्वही खोडून काढलं.
शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्याबाबतही मिटकरी कमी बोलले नाहीत. “ते एक ‘आऊटडेटेड वर्जन’ आहेत,” असं म्हणत, त्यांच्या शेतकरी कार्याचा सन्मान व्यक्त करतानाही, “अजितदादांवर बोलताना लायकी ठेवावी,” असा इशाराही त्यांनी दिला.
राजकीय टीका मुद्द्यांवर असावी, असं सामान्य जनतेचं मत असतं. मात्र, सध्या दिसतंय ते म्हणजे व्यक्तिगत आणि अपमानास्पद भाषेचा अतिरेक. या वादामुळे अजित पवार गट, काँग्रेस आणि शेतकरी संघटनांमध्ये शाब्दिक चकमकी आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.