शरद पवारांच्या आमदाराचा कृषीमंत्र्यांना टोला !

Manikrao Kokate : राज्यात सध्या कर्जमाफीचा विषय चांगलाच चर्चेत आहे. कर्जमाफीबाबत विचारताच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना सुनावलं. पाच-दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहता. तोपर्यंत कर्ज भरत नाही, असं कोकाटे यांनी म्हटलं. तसंच कर्जमाफीच्या पैशातून लग्न, साखरपुडा करता असंही ते शेतकऱ्याला उद्देशून म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी राज्याच्या कृषीमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मिडिया एक्सवरती पोस्ट करत कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना डिवचलं आहे. कमी उत्पन्न दाखवून सदनिका लाटण्याच्या प्रकरणाचा दाखल देत कोकाटेंना राजकीयदृष्ट्या थोडक्यात वाचला आहात त्यामुळे जरा जपून असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.
काय म्हणालेत रोहित पवार?
आपल्या सोशल मिडिया एक्सवरती रोहित पवारांनी पोस्ट करत म्हटलंय, ‘कोकाटे साहेब, कर्जमाफीचा पैसा बँकांना जमा होतो शेतकऱ्यांना मिळत नाही हे कदाचित आपल्याला ज्ञात नसावे. कर्जमाफीचा पैसा साखरपुडा, लग्नकार्यात खर्च करणे हे कमी उत्पन्न दाखवून सदनिका लाटण्याएवढे सोपे नाही. मुळात सदनिका प्रकरणात बुडाखाली अंधार असताना शेतकऱ्यांना ब्रम्हज्ञान देण्याची गरजंच नाही. रोज कोट बदलणाऱ्या कृषिमंत्र्यांना शेतकऱ्याचा फाटलेला सदरा दिसत नसला तरी आपल्या वादग्रस्त संवेदनांचं प्रदर्शन करून शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्यापेक्षा अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना काय मदत देता येईल यावर लक्ष केंद्रित केलं तर अधिक बरं होईल. राजकीयदृष्ट्या थोडक्यात वाचला आहात त्यामुळे जरा जपून…अशी पोस्ट रोहित पवारांनी त्यांच्या सोशल मिडियावरती शेअर केली आहे.
नेमकं काय म्हणालेत कोकाटे?
मला एक सांगा, आता येथे मीडिया आहे. मीडियासमोर असं बोलत नाही. पण तुम्ही मला सांगा. तुमची (शेतकऱ्यांची) कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाचं तुम्ही काय करता? शेतीमध्ये एक रुपयांची तरी गुंतवणूक करता का? सरकार तुम्हाला आता शेतीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पैसे देणार आहे. सरकार तुम्हाला पाईपलाईनाला पैसे, सिंचनासाठी पैसे, शेततळ्यासाठी पैसे देणार आहे. सरकार भांडवली गुंतवणूक करतं. मग शेतकरी भांडवली गुंतवणूक करतात का? शेतकरी म्हणतात, पीक विम्याचे पैसे पाहिजे, मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करा”, असं म्हणत माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना सुनावलं आहे. माणिकराव कोकाटे हे नाशिकच्या दौऱ्यावर होते. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करण्यासाठी ते नाशिकमध्ये गेले होते.