अकोला-अमरावती महामार्गावर भीषण अपघात

अकोला — अकोला-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर रविवारी पैलपाडा गावाजवळ एक भीषण अपघात घडला. या अपघातात संतोष महाजन आणि त्यांचा परिवार एका मोठ्या अनर्थातून थोडक्यात बचावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष महाजन हे आपल्या कुटुंबासह भिलाईहून मुक्ताईनगरकडे जात असताना त्यांच्या चारचाकी वाहनाचे नियंत्रण सुटले. गाडी थेट डिव्हायडरवर आदळून पलटी झाली. या भीषण अपघातात गाडीत असलेल्या तीन महिला आणि एका लहान मुलीला किरकोळ दुखापत झाली आहे.
घटनेनंतर काही क्षणातच ‘माँ चंडिका आपत्कालीन बचाव पथक’ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना सुरक्षित गाडीतून बाहेर काढले. स्थानिक नागरिकांचाही मदतीसाठी चांगला प्रतिसाद मिळाला.
सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.