गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून योजनांचा लाभ द्यावा – ॲड. निलेश हेलोंडे पाटील
अमरावती : जिल्ह्यातील संत्रा उत्पादक भागातही शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासोबतच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना तातडीने मदत मिळणे गरजेचे आहे. यासाठी सर्व यंत्रणांनी या गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांना योजनांचा लाभ द्यावा, असे आवाहन कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांना मदत होणाऱ्या योजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार, अतिरिक्त जिल्हाधिकारी विवेक जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर आदी उपस्थित होते.
ॲड. हेलोंड म्हणाले, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजना आहेत. शेतीमधील उत्पादन वाढविण्यासोबतच शेतकऱ्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहावे, यासाठी प्रेरणा प्रकल्प कार्यरत आहे. यातून शेतकऱ्यांची मानसिकता बदलणे शक्य होणार आहे. शेतकऱ्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करण्यासाठी आशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. यासाठी योग्य ती पावले उचलण्यात येतील. जिल्ह्यात केवळ 232 शेतकरी आत्महत्या केलेले कुटुंब आहे. त्यामुळे या प्रत्येक घरी अधिकारी पाहोचून त्यांना शासकीय योजनांची माहिती द्यावी.
आत्महत्याग्रस्त कुटुंबातील युवक प्राधान्य मानून त्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. कौशल्य विकास तसेच आरसेटीच्या माध्यमातून कमी कालावधीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. याचा उपयोग होऊन तातडीने उत्पन्नाचे साधन त्यांना मिळू शकेल. या योजना माहिती होण्यासाठी ग्रामपातळीवर प्रयत्न करण्यात यावे. यासोबतच शेतकऱ्यांना रेशनचे धान्य मिळावे, वन्य प्राण्यांचा बंदोबस्तासाठी उपाययोजना कराव्यात, कर्ज सुविधा मिळावी, शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांचा लाभ मिळवून देण्यात यावा, तसेच सर्व बाजार समित्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक वजनकाटे सक्तीचे केल्यास शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. तसेच अवैध सावकारांवर कारवाई करून जमीन मूळ मालकास परत करावी. यात आतापर्यंत 18 हेक्टर जमीन शेतकऱ्यांना परत करण्यात आली आहे, ही स्वागतार्ह बाब असून येत्या काळात कार्यवाहीचा वेग वाढविण्यात यावा, अशा सचूनाही ॲड. हेलोंडे यांनी दिल्या.