LIVE STREAM

Latest NewsMaharashtra

डिजिटल शिक्षणाचे धोरण स्विकारणे काळाची गरज -प्रा. राम शिंदे

 अहिल्यानगर :  आधुनिक तंत्रज्ञान युगामध्ये डिजिटल शिक्षण आवश्यक असून डिजिटल शिक्षण धोरण स्वीकारणे ही काळाची गरज  असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले. 

            ‘डिजिटल स्कूल’ या संकल्पनेअंतर्गत कर्जत तालुक्यातील  ८७ व जामखेड तालुक्यातील २४ अशा १११ शाळेतील इंटरॅक्टिव्ह टच पॅनल आणि महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित डिजिटल ई लर्निंग सॉफ्टवेअरचे लोकार्पण सभापती श्री. शिंदे यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांच्यासह जिल्ह्यातील गटविकास अधिकारी, शाळांमधील शिक्षक, विद्यार्थी तसेच पालक उपस्थित होते.

            सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अनेकवेळा ‘परीक्षा पे चर्चा’ या उपक्रमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचा आत्मविश्वास वाढवला आहे. शिक्षण हे तणावमुक्त व सृजनशील असले पाहिजे यावर त्यांनी नेहमीच भर दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली डिजिटल शिक्षणाच्या पर्वाची सुरुवात झाली आहे. त्याला अनुसरूनच ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

             आधुनिक तंत्रज्ञानातून विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य साकारले जाणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना सर्व विषयांची उकल अत्यंत सुलभपणे होणार आहे. रंगात्मक आणि चित्रकात्मक पद्धतीने विद्यार्थ्यांना विषय समजून सांगता येणार आहेत. फळा, खडू, डस्टर ही संकल्पना नष्ट होत आहे. यापूर्वीही विद्यार्थ्यांना इंटरॅक्युअल बोर्ड, डिजिटल बोर्ड उपलब्ध करुन देण्यात आले असून यानंतरही शाळांना अशाच पद्धतीची शिक्षण व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही सभापती प्रा.शिंदे म्हणाले.

            शिक्षक हा शिक्षणाचा आत्मा आहे. शिक्षकांनीही आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरणे ही काळाची गरज बनली आहे. शिक्षकांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत त्यांचे  उज्ज्वल  भविष्य घडविण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या कलानुसार शिक्षण देण्याची गरज आहे. सृजनशिलतेला आव्हान आणि प्रोत्साहन देणारे हे स्मार्ट बोर्ड विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारी जादुई खिडकी आहे. डिजिटल युगामध्ये नवीन काय आहे हे विद्यार्थ्याला पहायला, ऐकायला आणि प्रात्यक्षिक करायला मिळाले तर यातून विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्याचा उत्साह वाढून त्यांचे भविष्य या माध्यमातून निश्चितच  घडू शकेल, असा विश्वासही सभापती प्रा.शिंदे यांनी व्यक्त केला. 

            आजचे युग हे डिजिटल तंत्रज्ञानाचे आहे. पूर्वीच्या शिक्षण पद्धतीमध्ये आणि आजच्या शिक्षणामध्ये मोठे बदल झाले आहे. आधुनिकतेच्या युगाच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांना टिकायचे असेल तर डिजिटल शिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे. चिकाटी आणि सतत ज्ञान मिळविण्याची भूक असेल तर यातून एक मोठ परिवर्तन घडू शकते. त्यामुळे हे डजिटल शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी पूरक ठरणार आहे. केवळ शिक्षकांनीच नव्हे तर पालकांनीसुद्धा विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

            जिल्ह्यातील १११ शाळांमधून आपण एकाचवेळी या इंटरॅक्टिव्ह टच पॅनलचे लोकार्पण केवळ डिजिटल तंत्रज्ञानामुळे आपण करु शकत आहोत, हीच या तंत्रज्ञानाची ताकद असल्याचे सांगत हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक आणि पालकांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवत त्यांचे कुतुहल जपण्याचे काम करण्याची गरज आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात अनुकूल परिवर्तन घडविण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.

            जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांनी प्रास्ताविक केले.

विद्यार्थ्यांनी साधला सभापतींशी संवाद

इंटरॅक्टिव्ह टच पॅनल आणि डिजिटल ई लर्निंग सॉफ्टवेअरचे लोकार्पण कार्यक्रमादरम्यान जिल्हा परिषद शाळेच्या इयत्ता ६ वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या महेंद्र कोकाटे व प्रवीणराज गलांडे यांनी सभापती प्रा. राम शिंदे यांच्याशी संवाद साधला. इंटरॅक्टिव्ह टच पॅनलबाबत शिक्षकांनी संपूर्ण माहिती दिल्याने सर्व विषय समजण्यास मोठी मदत झाली. डिजिटल शिक्षणामध्ये सर्व विषयांबरोबरच संस्कृत विषयाचा समावेश असल्याने संस्कृत भाषेचे ज्ञान प्राप्त करुन घेण्यात सहजता येत असुन कृत्रिम बुद्धीमत्तेकडे यशस्वीपणे उचललेले हे पहिले पाऊस असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी सभापतींचे आभारही व्यक्त केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!