नवी मुंबईत हत्येचा थरार; कार चालकाला संपवून प्रेमी युगुल फरार, थरकाप उडवणारा घटनाक्रम समोर

नवी मुंबई : उलवे भागात राहणाऱ्या सुरेंद्र आसाराम पांडे या चालकाची हत्या केल्यानंतर त्याची कार घेऊन पळून गेलेल्या 19 वर्षीय तरुणी आणि तिचा प्रियकर संगमनेर पोलिसांच्या हाती लागल्याची घटना उघडकीस आली आहे. संगमनेर पोलिसांकडुन याबाबतची माहिती मिळाल्यानंतर उलवे पोलिसांनी सुरेंद्र पांडे याच्या घरात जाऊन पाहणी केल्यानंतर त्याचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळुन आला. त्यानंतर उलवे पोलिसांनी या हत्या प्रकरणातील तरुणी रिया दिनेश सरकल्याणसिंग (19) आणि तिचा प्रियकर विशाल संजय शिंदे (21) या दोघांना अटक केली आहे. शरीर सुखाची मागणी करत असल्याने हत्या केल्याचे दोघांनी सांगितले.
या घटनेतील मृत सुरेंद्र पांडे हा मुळचा उत्तरप्रदेश राज्यातील प्रयागराज येथील रहिवासी असून सध्या तो उलवे सेक्टर-24 मधील मोहागाव येथील क्रियांश रेसीडेन्सी इमारतीत एकटाच राहत होता. तसेच तो ओला कार चालवून आपला उदरनिर्वाह चालवत होता. महिन्याभरापुर्वी सुरेंद्र पांडे याची आरोपी तरुणी रिया सरकल्याणसिंग हिच्यासोबत ओळख झाली होती. मुळची पंजाब राज्यातील रिया ही नोकरीच्या शोधात असल्याने सुरेंद्र पांडे याने तिला नोकरीसाठी मदत करण्याचे आश्वासन देऊन तिला आपल्या घरामध्ये आसरा दिला होता. तेव्हांपासून रिया सुरेंद्र पांडे याच्या घरामध्ये राहत होती.
उलवे येथील घरात नेमकं काय घडलं?
चार दिवसापुर्वी रियाने संगमनेर येथे राहणाऱ्या विशाल शिंदे या प्रियकराला उलवे येथील घरी बोलावून घेतले होते. तो सुद्धा रियासोबत सदर घरात राहु लागल्यानंतर गत 2 एप्रिल रोजी सुरेंद्र पांडे याचे रिया, विशाल यांच्यासोबत भांडण झाले. या भांडणात रिया आणि विशाल या दोघांनी सुरेंद्र पांडे याच्या डोक्यात हातोड्याने हल्ला करुन त्याची हत्या केली. त्यानंतर या दोघांनी त्याचा मृतदेह चादरीत बांधुन ठेवून दिल्यानंतर त्याच्या घराला बाहेरुन टाळे लावून त्याची वॅगनार कार घेऊन पळ काढला होता. यादरम्यान, त्यांच्या वॅगनार कारचा पुण्याजवळ अपघात झाला. या अपघातातून बचावल्यानंतर ते थेट संगमनेर येथे विशालच्या घरी पोहोचुन त्यांनी घरच्यांना घडल्या प्रकाराची माहिती दिली.
विशालच्या घरच्यांनी त्यांना पोलिसांत हजर होण्याचा सल्ला दिल्यानंतर ते स्वत: संगमनेर पोलीस ठाण्यात हजर झाले. तसेच त्यांनी सुरेंद्र पांडे याची हत्या केल्याची कबुली देऊन त्याचा मृतदेह त्याच्या घरामध्ये चादरीत बांधून ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर संगमनेर पोलिसांनी उलवे पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर उलवे पोलिसांनी शनिवारी रात्री सुरेंद्र पांडे राहत असलेल्या घरी धाव घेऊन घराचे टाळे तोडून घरात प्रवेश केला असता, घरामध्ये सुरेंद्र पांडे याचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळुन आला. त्यानंतर उलवे पोलिसांनी संगमनेर येथे जाऊन रिया आणि विशाल या दोघांना ताब्यात घेतले. सुरेंद्र पांडे शरीर सुखाची मागणी करत असल्याने हत्या केल्याचे दोघांनी सांगितल्याची प्राथमिक माहिती तपासाअंती समोर आल्याचं कळत आहे.