लग्नास नकार दिला म्हणून प्रेयसीच्या पोटावर चाकूहल्ला!
अकोला : लग्नास नकार दिला म्हणून संतप्त प्रियकराने आपल्या प्रेयसीवर चाकूने प्राणघातक हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आरोपीला अटक केली असून जखमी तरुणीवर उपचार सुरू आहेत.
अकोला जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर सोनाळा बायपास… संध्याकाळच्या वेळेस येथे घडला एक थरारक प्रकार – प्रेमात अपयश आल्यावर एका युवकाने आपल्या प्रेयसीवर चाकूने हल्ला केला! संतोष प्रकाश डिवरे, वय २५, राहणार जवळा, ता. शेगाव – हा युवक एका २२ वर्षीय तरुणीस आपल्या कारने सोनाळा रोडवर घेऊन गेला होता. प्रेमसंबंध असले तरी तरुणीने लग्नास नकार दिला, त्यामुळे संतोष संतप्त झाला आणि त्याने थेट तिच्या पोटात धारदार चाकूने वार केला. तरुणी गंभीर जखमी झाली. ती अकोला शहरातील खासगी रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत असून, मूळची बाळापूर तालुक्यातील आहे. हल्ल्यानंतर संतोष घटनास्थळावरून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच, बोरगाव मंजू पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला अटक केली. सध्या गंभीर जखमी तरुणीवर अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. प्रेम, नातं, आणि मानवी समजुती यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ही घटना आहे.
प्रेम हे दोन जीवांचं नातं असावं, पण जेव्हा त्यात जबरदस्ती आणि हिंसेचं रूप घेतलं जातं, तेव्हा अशा घटना घडतात. बोरगाव मंजूतील या घटनेने पुन्हा एकदा विकृत विचारसरणीवर प्रकाश टाकला आहे.