वडिलोपार्जित संपत्तीच्या वादातून मोठ्या भावाची आत्महत्या – 7 महिन्यांनी लहान भावावर गुन्हा दाखल

वडिलोपार्जित संपत्तीतील हिस्स्याच्या वादातून मोठ्या भावाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सात महिन्यानंतर या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडिलोपार्जित संपत्तीतील हिस्स्यावरून लहानभावाने मोठ्या भावामागे तगादा लावल्याने मानसिक तणावातून मोठ्या भावाने आत्महत्या केल्याची घटना परळ भागात घडली आहे. तब्बल सात महिन्यानंतर भोईवाडा पोलिसांनी या प्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे.
संपत्तीचा नेमका वाद काय?
मूळचे उत्तरप्रदेशच्या रहिवाशी असलेल्या तक्रारदार उर्मिला शुक्ला या मृत अशोक शुक्ला यांच्या पत्नी आहेत. अशोक हे व्यावसायिक असून त्यांचा लहान भाऊ रमेश हा टॅक्सीचालक आहे. मुंबईतील एका वडिलोपार्जित खोलीच्या हिस्स्यावरून दोघांमध्ये काही वर्षांपासून वाद सुरू होते. मूळात अशोक यांनी या वडिलोपार्जित घराचे पालिकेच्या रितसर परवानग्या घेत गॅरेजमध्ये रुपांतर केले होते. तर अशोक यांनी रमेशला वडाळा येथे एक पिठाची गिरणी आणि घर अशी मालमत्ता गॅरेजच्या बदल्यात घेऊन दिली होती
पोलिसांनी मृत्यू आधी नोंदवला जबाब
मात्र रमेशने परळ येथील वडिलोपार्जित घरावर हिस्सा मागितला. या विरोधात अशोकने न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने अशोकच्या बाजूने निकाल देऊनही रमेशकडून हिस्सासाठी तगादा लावला जात होता. रोजच्या त्रासाला कंटाळून 25 ऑगस्ट रोजी विषारी द्रव्य प्राशन केले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच अशोक यांचा रुग्णालयात जबाब घेण्यात आला. त्यावेळी लहान भावाच्या रोजच्या त्रासाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याचे अशोक यांनी सांगितले.
भावाच्या मृत्यूनंतरही…
दरम्यान, भोईवाडा पोलिसांनी अशोक यांचा जबाब नोंदवल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अशोक यांच्या मृत्यूनंतरही रमेश हिस्स्यासाठी अशोकच्या कुटुंबियांकडे तगादा लावत होता. या प्रकरणी पोलिसांनी 7 महिन्यानंतर मोठ्या भावाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी लहान भाऊ रमेशवर भोईवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.