शॉर्ट सर्किटमुळे गव्हाच्या पिकाला भीषण आग! शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान!
अकोला : दहिगाव गावंडे परिसरात गजानन इंगळे यांच्या शेतात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत चार एकरवरील गव्हाचे पीक जळून खाक झाले आहे.
या घटनेत शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले असून, या संकटात शासनाने तात्काळ मदतीचा हात द्यावा, अशी मागणी होत आहे.
अकोला जिल्ह्यातील दहिगाव गावंडे – इथं आज दुपारी अचानक लागलेल्या आगीत शेतकऱ्याच्या आयुष्यभराच्या मेहनतीला काळानं ग्रासलं. शेतकरी गजानन इंगळे यांनी मोठ्या आशेने यंदा चार एकरमध्ये गव्हाची लागवड केली होती. पीक सोंगणीसाठी तयार होतं… पण आजच्या शॉर्ट सर्किटच्या घटनेनं त्यांच्या आयुष्याचं गणितच बदलून टाकलं. आग लागल्याचे लक्षात येताच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी धाव घेत आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण उन्हाच्या तडाख्यात आणि वाऱ्याच्या झोतामुळे आग काही नियंत्रणात आली नाही आणि गव्हाचं संपूर्ण पीक जळून खाक झालं. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झालं असून शेतकरी इंगळे अक्षरशः हवालदिल झालेत. शासनाने या घटनेची तात्काळ दखल घेऊन आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी संघटनांसह ग्रामस्थांनी केली आहे.
शेतकऱ्याचं आयुष्य हे पावसावर, ऊनावर आणि नशिबावर अवलंबून असतं. पण आज दहिगाव गावंडेत शॉर्ट सर्किटमुळे झालेल्या आगीत एका शेतकऱ्याचं स्वप्नच जळून गेलं. या संकटात शासनाने तात्काळ मदत करून शेतकऱ्याला दिलासा द्यावा, हीच अपेक्षा.