सावर्डी गावाजवळ भीषण अपघात: ट्रकच्या धडकेत युवकाचा मृत्यू

अमरावती — अमरावतीजवळील सावर्डी गावानजीक असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ राष्ट्रीय महामार्गावर रात्री उशिरा एक भीषण अपघात घडला. या अपघातात शिवणगावकडे दुचाकीने जात असलेले राहुल संजय डिवरे (वय २८) यांचा मृत्यू झाला, तर त्यांचा मित्र रोशन गजानन पांडे गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीत काही वैयक्तिक कामानिमित्त आलेले हे दोघे मित्र रात्रीच्या सुमारास दुचाकीने परत जात होते. त्यावेळी एका अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की राहुल डिवरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर रोशन पांडे गंभीर अवस्थेत सध्या उपचार घेत आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे, धडक दिल्यानंतर ट्रकने राहुलला मागील चाकांखाली फरफटत नेले. मोठ्या अंतरापर्यंत फरफटत नेल्यामुळे त्यांचा मृत्यू अत्यंत वेदनादायक ठरला. घटनास्थळी दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला होता, आणि हे दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.
नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी रोशन पांडे यांच्या तक्रारीवरून अज्ञात ट्रक चालकाविरोधात भारतीय दंड विधान कलम २८१, १२५ (A), १०६, १३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर संबंधित ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.