सासू- सासऱ्यांच्या संपत्तीवर सुनेचा किती हक्क? कायद्यात कोणत्या अधिकारांची नोंद?

Right on ancestral property : संपत्तीतील अधिकारांसंदर्भात अनेक अधिकृत कायदे असून, संपत्तीचे प्रकार आणि विविध प्रकरणांमध्ये कायद्यान्वये मिळणारे हे अधिकार लागू असतात. महिलांसाठीसुद्धा या कायद्यांमध्ये विशेष तरतुदी करण्यात आल्या असून, त्यांची माहिती असणंही महत्त्वाचं. अशाच संपत्तीच्या अनेक प्रकरणांमध्ये बऱ्याचदा उपस्थित केला जाणारा प्रश्न म्हणजे, सासू- सासऱ्यांच्या संपत्तीमध्ये सुनेला हक्क सांगता येतो का?
भारतात संपत्तीविषयक अनेक प्रकरणं समोर येत असून, कायद्यान्वये यावर तोडगा काढण्यासाठी काही विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. राहिला प्रश्न सासू- सासऱ्यांच्या संपत्तीतील सुनेच्या वाट्याचा, तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सुनेला सासरी वैवाहिक संबंध अस्तित्वात असेपर्यंत सासरच्या घरात राहण्याचा अधिकार आहे. मात्र तिचा सासू- सासऱ्यांच्या संपत्तीवर कायदेशीर हक्क नसून, तिला तसा दावाही ठोकता येत नाही.
अधिकृतरित्या एखादी महिला एखाद्या कुटुंबाची सून नसल्यास तिला सासरच्या संपत्तीत हक्क सांगता येत नाही. कायदा सांगतो, की, सासू सासऱ्यांच्या स्वअर्जित संपत्तीवर सुनेचा कोणताही हक्क नसतो. तर, सुनेला या संपत्तीचा हक्क केवळ तिच्या पतीच्याच माध्यमातून मिळतो. सासू- सासरे सुनेला संप्ततीतील ठराविक हिस्सा देऊ इच्छित असल्यास रितसर मृत्यूपत्र बनवून त्यात ते तिला हा अधिकार देऊ शकतात. इथं त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची बळजबरी केली जाऊ शकत नाही.
पतीकडून जर आपल्या वाटणीला आलेल्या संपत्तीचा हक्क किंवा त्याचा काही भाग पत्नीकडे हस्तांतरिक केल्यासच सुनेचा सासू- सासऱ्यांच्या वडिलोपार्जित संपत्तीत स्थान किंवा हक्क सांगता येतो हीच बाब इथं लक्ष देण्याजोगी.