बाबासाहेबांच्या माध्यमातून भाऊसाहेबांनी सामाजिक समतेच्या दृष्टीने संविधानात प्रावधान केले – शेषराव खाडे
अमरावती : डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी बालपणापासूनच कुठल्याच जाती व धर्माचा भेद न पाळता सर्व जातीतील मुलांना व नागरिकांना सोबत घेवून देशाच्या विकासासाठी कार्य केले. एस.सी., एस.टी. व्यतिरिक्त इतर जे मागासलेले आहेत, त्यांच्यासाठी संविधानात कलम 340 बाबासाहेबांना अंतर्भूत करण्यास सांगून सामाजिक समता प्रस्थापित केली, असे प्रतिपादन श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीचे माजी सचिव श्री शेषराव खाडे यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात दि. 8 ते 14 एप्रिल दरम्यान समता सप्ताह निमित्त डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून ‘डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचा सामाजिक समतेचा दृष्टीकोन’ या विषयावर व्याख्यान देतांना ते बोलत होते. डॉ. श्रीकांत जिचकार स्मृती सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील, विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष श्री अजय देशमुख, डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड, डॉ. पंजाबराव देशमुख विभागीय अर्थव्यवस्था अध्ययन व नियमन केंद्राचे समन्वयक डॉ. महेंद्र मेटे व जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर उपस्थित होते.
प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांनी शाल व स्मृतिचिन्ह देवून श्री शेषराव खाडे यांचा विद्यापीठाच्यावतीने सत्कार केला. विषयाची मांडणी करतांना श्री खाडे पुढे म्हणाले, संविधानामध्ये समतेची व्याख्या करुन समता व समान संधी या देशातील सर्व नागरिकांना मिळायला हव्यात, याबाबत बाबासाहेबांनंतर स्पष्ट भूमिका भाऊसाहेबांनी मांडली होती. राज्यघटनेच्या उद्देशिकेत स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय, व्यक्तीची प्रतिष्ठा, दर्जा आणि संधीची समानता अंतर्भूत आहे. भाऊसाहेबांनी शालेय शिक्षणापासूनच अठरा पगड जातीतील लोकांना सोबत घेवून कार्य केले. त्या सर्वांच्या सहकार्यातून सामाजिक विकास साधण्याचा प्रयत्न केला. प्राथमिक शिक्षण घेत असतांना सर्व जातीतील मुले त्यांच्यासोबत होते, त्यांच्या दयनीय परिस्थितीची भाऊसाहेबांना जाण होती. आपल्या वडीलांच्या तेरवीत त्यांनी बहुजनातील मुलांना आमंत्रित करुन समतेचा संदेश त्याकाळी दिला होता. बहुजनातील मुले शिकली पाहिजे, त्यांना समाजामध्ये दर्जा मिळाला पाहिजे आणि त्यातूनच खयाअर्थाने समानता निर्माण होईल, यासाठी त्यांनी अमरावती येथे श्री शिवाजी शिक्षण संथेची स्थापना करुन गोरगरीबांच्या मुलांसाठी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन दिल्यात. हा त्यांचा प्रयत्न व दृष्टीकोन सामाजिक समतेकडे घेवून जाणारा आहे. अमरावतीतील अंबा मंदीर सर्व जातीतील लोकांसाठी खुले व्हावे, यासाठी भाऊसाहेबांनी सत्याग्रह केला. त्यांनी कधीच जात-पात आणि धर्म पाळला नाही. सर्व जाती-धर्मातील लोकांना एकत्र घेवून त्यांनी कार्य केले.
आज विकास झाल्याचे सांगितल्या जाते. केवळ भौतिक व आर्थिक विकास होवून चालणार नाही, तर सामाजिक, संस्थात्मक आणि सांस्कृतिक विकास व्हायला पाहिजे. प्रगती आणि विकास या भिन्न बाबी आहेत. महापुरुषांचे जीवनचरित्र प्रत्येकाने वाचावे, याकरीता समता पर्वाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या वाचन संस्कृतीचा विकास होण्याकरीता प्रयत्न व्हावेत, असेही ते म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे म्हणाले, श्री खाडे यांनी आपल्या व्याख्यानातून भाऊसाहेबांच्या सामाजिक समतेच्या दृष्टीने अनेक दाखले दिलीत. खयाअर्थाने समता म्हणजे काय ?, हे सोप्या भाषेत सांगून भाऊसाहेबांनी आयुष्यभर केलेल्या कार्यावर त्यांनी प्रकाश टाकला. प्रगती आणि विकासाची सुंदर मांडणी अतिशय सोप्या भाषेत केली. आंतरजातीय विवाह करुन भाऊसाहेबांनी सामाजिक समतेचा आदर्श नागरिकांपुढे ठेवला. श्री खाडे यांचे व्याख्यान सर्वांसाठी उद्बोधक ठरल्याचेही ते यावेळी म्हणाले.
राष्ट्रगीत व विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. महात्मा ज्योतिबा फुले, संत गाडगे बाबा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पार्पण व मेणबत्तीपूजन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक समन्वयक डॉ. महेंद्र मेटे यांनी केले. संचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी, तर आभार समन्वयक डॉ. संतोष बनसोड यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन चांगोले, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी, रासेयो संचालक डॉ. निलेश कडू, अधिसभा सदस्य डॉ. सुभाष गावंडे, श्री कैलास चव्हाण, श्री अमोल देशमुख यांचेसह विद्यापीठातील विभागप्रमुख, अधिकारी, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.