LIVE STREAM

Latest NewsMaharashtra Politics

Ajit Pawar & Manikrao Kokate: बैठकीला अर्धा तास उशीरा पोहोचले, माणिकराव कोकाटेंना पाहून अजितदादांचा पारा चढला, सगळ्यांदेखत पाणउतारा केला

मुंबई: महायुती सरकारमध्ये कृषीमंत्री झाल्यापासून सातत्याने वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेल्या माणिकराव कोकाटे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांच्या रोषाचा सामना करावा लागल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्या मुंबईतील देवगिरी या निवासस्थानी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नियोजित बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांना खडेबोल सुनावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या बैठकीला माणिकराव कोकाटे हे अर्धा तास उशीरा पोहोचले. तोपर्यंत राष्ट्रवादीचे इतर नेते देवगिरीवर दाखल होऊन बैठकीला सुरुवात झाली होती. त्यामुळे अजित पवार यांनी बैठकीला उशीरा आलेल्या माणिकराव कोकाटे यांना चांगलेच फैलावर घेतले. प्रसारमाध्यमांसमोर सातत्याने पक्षाला अडचणीत आणणारी वक्तव्यं करणे, जनता दरबारला पक्ष कार्यालयात हजर न राहणे, यावरून अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांना झापल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. तसेच बेशिस्त वर्तणुकीवरूनही अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांना खडेबोल सुनावल्याचे सांगितले जाते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साप्ताहिक आढावा बैठक काल मान्यवर लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. प्रत्येकाच्या मतदासंघातील विकास कामांचा आढावा घेतला. निधीअभावी कामं रखडता कामा नये, लोकांची गैरसोय होऊ नये, अशा सूचना केल्या. त्याचप्रमाणे अधिक कार्यक्षम होण्यासाठी सर्वांना प्रोत्साहित केले, असे ट्विट अजित पवार यांनी या बैठकीनंतर केले होते.

माणिकराव कोकाटेंनी मागितली माफी
माणिकराव कोकाटे काही दिवसांपूर्वी दौऱ्यावर असताना शेतकऱ्यांनी त्यांना कर्जमाफीबाबत विचारणा केली होती. तेव्हा माणिकराव कोकाटे यांनी या शेतकऱ्यांना सरकारचे प्रतिनिधी म्हणून दिलासा देणे तर सोडाच पण उलट त्यांना जाब विचारला होता. कर्जमाफी झाल्यानंतर तुम्हाला पैसे येतात. त्या पैशांचं तुम्ही काय करता? त्या पैशांतून शेतीमध्ये एक रुपयाची तरी गुंतवणूक करता का? कर्जमाफीचे पैसे तुम्ही सारखपुडा आणि लग्न कार्यासाठी वापरता, असे माणिकराव कोकाटे यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन प्रचंड गदारोळ माजला होता. विरोधकांनी या वक्तव्यावरुन महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली होती. अखेर माणिकराव कोकाटे यांनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. शेतकऱ्यांचा मान सन्मान दुखावला गेला असेल, भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. माझ्याकडून शेतकऱ्यांची अनावधानाने आणि मस्करीची कुस्करी झाली. शेतकऱ्यांना सुख-समृद्धी लाभावी, अशी प्रार्थना मी करतो, असे माणिकराव कोकाटे यांनी म्हटले होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!