Pune Crime: पुण्यात भूतानच्या तरुणीवर सात जणांकडून अत्याचार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी पदाधिकाऱ्याला अटक

पुणे: भूतान देशाची नागरिक असलेल्या 27 वर्षीय तरुणीवर पुण्यात सात जणांकडून लैंगिक अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही भूतानी महिला 2020 पासून पुण्यात वास्तव्याला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही मूळची भूतान या देशाची असून 2020 मध्ये ती भारतात असलेल्या बोध गया येथे आली होती. त्यानंतर शिक्षण आणि नोकरी करण्याच्या निमित्ताने तिची ओळख आरोपी ऋषिकेश याच्यासोबत झाली. ऋषिकेश याने त्या पीडित महिलेची ओळख त्याचा मित्र शंतनू कुकडे याच्यासोबत करून दिली. कुकडे याने पीडित महिलेला पुण्यात एक घर वास्तव्यास दिले तसेच तिच्या शिक्षणासाठी देखील आर्थिक मदत केली. याच ओळखीचा फायदा घेत शंतनु कुकडे याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
शंतनू कुकडे याच्यावर काही दिवसांपूर्वी दोन तरुणींनी लैंगिक अत्याचारप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी त्याप्रकरणी गुन्हाही दाखल केला होता. आताच्या प्रकरणात पोलिसांनी शंतनू कुकडे आणि त्याच्या मित्रांना अटक केली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यावरून शंतनू कुकडे याच्यासह ऋषिकेश नवले, जालिंदर बडदे, उमेश शहाणे, प्रतीक शिंदे, ॲड विपीन बिडकर, सागर रासगे, अविनाश सूर्यवंशी आणि मुद्दासीन मेनन यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली.
राहायला जागा दिली अन् मित्रांकडून लैंगिक अत्याचार
शंतनू कुकडे याच्यावर काही दिवसांपूर्वी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्याचा तपास करताना काही गोष्टी समोर आल्या. त्यामध्ये आणखी एक फिर्यादी समोर आली आहे. त्या फिर्यादीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये नमूद केल्यानुसार, शंतनू कुकडे हा मुख्य आरोपी आहे. पीडित महिला ही गेल्या चार-पाच वर्षांपासून शंतनू कुकडे याला ओळखत होती. शंतनू कुकडे हा पुण्यात एक संस्था चालवत होता. या संस्थेत शंतनू कुकडे याने पीडित तरुणीला राहण्यासाठी जागा दिली होती. यादरम्यान दोघांमध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले. एक-दोन वर्षांनी शंतनूचे मित्रही तिकडे येऊ लागले. हे सगळेजण अनेकदा बाहेरही जायचे. या मित्रांनी वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या वेळी पीडित तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. यामध्ये शंतनू कुकडे याच्यासह ९ जण आरोपी आहे. पीडित तरुणी मूळची भूतानची आहे. काही वर्षांपूर्वी ती पुण्यात नोकरी आणि शिक्षणाच्या उद्देशाने आली होती. पुण्यात ती ऋषिकेशला भेटली. त्याच्यासोबतही तरुणीचे संबंध होते. ऋषिकेशने या तरुणीची ओळख शंतनूशी करुन दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली.