अमरावतीत अवकाळी पावसाची दहशत! विजांचा कहर, शेती धोक्यात

अमरावती : अमरावती जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी शेतकऱ्यांसाठी हा पाऊस संकटाची सुरुवात ठरला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला, तर संत्रा, आंबा, टरबूज, खरबूज, तीळ आणि भुईमूगासारख्या उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
काही ठिकाणी आंब्याची गळ होऊ लागल्याच्या तक्रारी समोर येत असून, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवसांत तापमानात घट होऊन पूर्व विदर्भात हलक्या सरी पडतील, असा अंदाज वर्तवला आहे. मात्र, या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे.
शहरात वीज पुरवठा विस्कळीत झाल्याने अनेक भाग अंधारात बुडाले आहेत. वीज वितरण यंत्रणेला या वादळी वाऱ्याचा आणि पावसाचा जबरदस्त फटका बसला असून, त्याचा परिणाम नागरिकांसह शेतकऱ्यांवरही झाला आहे. वीज खंडित झाल्याने पाणीपुरवठा आणि दैनंदिन कामांवरही परिणाम झाला असून, नागरिक आणि शेतकरी दोघेही हवालदिल झाले आहेत.
शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने नुकसानीचे सर्वेक्षण करून मदत देण्याची मागणी केली आहे, तर वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी वीज वितरण कंपनीकडून प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.