परतवाड्यात महावीर जयंती शोभायात्रेचं भव्य आयोजन

परतवाडा : परतवाडा येथील श्री चंद्रप्रभू मंदिरातून आज, 10 एप्रिल रोजी सकल जैन समाजाच्या वतीने भगवान महावीर जयंतीनिमित्त एक भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ही शोभायात्रा सदर बाजारपासून सुरू होऊन मिश्रा लाइन, टिळक चौक, धुराणी चौक असा मार्गक्रमण करत पुन्हा सदर बाजारात परतली. तिथे महाआरतीच्या पवित्र वातावरणात या यात्रेचा समारोप झाला.
जैन समाज हा अहिंसेच्या मार्गावर चालणारा समाज म्हणून ओळखला जातो. या शोभायात्रेद्वारे ‘अहिंसा परमो धर्मः’ आणि ‘जिओ और जीने दो’ हा संदेश संपूर्ण शहरभर पोहोचवण्यात आला. पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या महिला, पुरुष, तरुण आणि लहान मुलांनी मोठ्या संख्येने या यात्रेत सहभाग घेतला.
ढोल-ताशांचा गजर, रंगीबेरंगी रांगोळ्या आणि आकर्षक झांक्यांनी सजलेली ही शोभायात्रा धार्मिक एकतेचा आणि भक्तीचा सुंदर अनुभव देणारी ठरली. परतवाड्याच्या रस्त्यांवर भक्तीचा महापूर उसळला असून, संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण पसरले होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सकल जैन समाजाच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. स्थानिक नागरिकांनीही रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून स्वागत केले आणि एकतेचे दर्शन घडवले. ही शोभायात्रा परतवाड्यातील धार्मिक आणि सामाजिक समरसतेचे प्रतीक बनली.