संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या जीर्णोध्दारच्या कामांना गती द्या – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

मुंबई : पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या जीर्णोद्धाराकरिता 149 कोटींच्या कामांना गती देण्याच्या सूचना पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.
मंत्रालयात पैठण पर्यटन विकास आराखड्यासंदर्भात पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी यासह पर्यटन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पर्यटन मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या पुनर्विकासासाठी 149 कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देऊन, टप्प्याटप्याने निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तरी या कामाला प्राधान्य देण्यात यावे. महाबळेश्वर येथे होणाऱ्या पर्यटन महोत्सवाची संपूर्ण तयारी काटकरपणे करावी. प्रादेशिक पर्यटन विकास आराखडा अंतर्गत कामे नियोजन पूर्वक करावीत.
गोराई येथे पर्यटन विभागामार्फत करण्यात येणाऱ्या विकास कामांचा सविस्तर आराखडा तयार करावा त्याचप्रमाणे खासगी सल्लागाराकडूनही याबाबतीत सल्ला घ्यावा. राज्यातील पर्यटनाला चालना देणारा प्रकल्प येथे उभारण्यासाठी सर्वतोपरी काम करण्यात यावे अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.