सुप्रिया सुळे स्टंटबाज? अजित पवारांचा सूचक टोला!

पुण्यातील रस्त्यासाठी उपोषणाला बसलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे स्टंटबाजी करतात का असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकारांनी विचारला. या प्रश्नाला अजित पवारांनी आधी अगदी दोन शब्दांमध्ये उत्तर दिलं. त्यानंतर त्यांनी एका वाक्यात सूचक पद्धतीने सुप्रिया सुळेंना टोला लगावल्याचं दिसून आलं.
सुप्रिया सुळे स्टंटबाजी करत आहेत का? वर म्हणाले…
सुप्रिया सुळे स्टंटबाजी करत आहेत का? या प्रश्नावर अजित पवारांनी, “नो कमेंट्स” अशी प्रतिक्रिया नोंदवताना थेट भाष्य करणं टाळलं. मात्र त्यावेळेस पुढे बोलताना अजित पवारांनी, “हा रस्ता अवघा 600 मीटरचा आहे आणि रस्ता व्हावा ही इच्छाच असेल तर खासदार निधीतून तो रस्ता करता येऊ शकतो,” असं म्हणत सुप्रिया सुळेंना अप्रत्यक्षपणे टोला लागवला. पिंपरीमध्ये विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या नागरी सत्कारासाठी ते आले असता पत्रकारांशी बोलताना त्यांनी सुप्रिया सुळे यांना हा टोला लगावला.
सुप्रिया सुळेंना टोला
सुप्रिया सुळेंचा उल्लेख करत प्रश्न विचारण्यात आला असता अजित पवारांनी, “नो कमेंट्स, मी 35 वर्षे काम करतोय. 600 मीटरच्या रस्त्याकरता? (असं म्हणत, मान डोलवली) आमदार अन खासदारांना 5 कोटींचा निधी मिळतो. काम करायचं म्हटलं तर एका मिनिटांत करता आलं असतं,” असं सूचक विधान केलं.
“मुळात मागच्या आमदाराने…”
“तो रस्ता फक्त 600 मीटरचा रस्ता आहे. देवगिरी बंगल्यावर मंगळवारी बैठक होते. त्यावेळी शंकर मांडेकरने माझ्याकडे हा विषय मांडला. अवघ्या 600 मीटरच्या रस्त्याबाबत हे सुरु आहे. मांडेकर स्थानिक आमदार आहे, मी त्याला सांगितलं आहे. मुळात मागच्या आमदाराने त्याकडे लक्ष दिलं नाही. मी त्याला निधी देऊन, लवकरच काम सुरू करतो. हे मी कालच सांगितलं होतं. 2 तारखेला नव्हे तर ताबडतोब काम सुरू करतोय अन तो मी पूर्ण करेन,” असं अजित पवार म्हणाले.
घैसास यांची पाठराखण?
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणात डॉक्टर घैसास यांनी राजीनामा दिला असला तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे त्यावर काय कारवाई करणार असं विचारलं असता अजित पवार यांनी याबाबत चौकशी अहवाल आल्यानंतर त्याबाबत निर्णय होईल असा स्पष्टीकरण दिलं. कधीकधी आरोप झाल्यानंतरही राजीनामा द्यावा लागतो पण चौकशीनंतरच त्यावर कारवाई होईल असं सांगत अजित पवार यांनी घैसास यांच्या प्रश्नावर बगल देत एक प्रकारे घैसास यांची पाठराखण केल्याचं दिसून आलं.
मात्र ते आरोप सिद्ध व्हायला हवेत ना?
“मुख्यमंत्र्यांनी चौकशी समिती नेमलेली होती. त्याचे दोन अहवाल सादर झालेत, एक व्हायचा आहे. अहवालात काय आलंय, त्याअनुषंगाने सरकार कारवाई करेल. आता काही जण म्हणतायत 27 कोटींचा कर थकवला आहे. मात्र ही फक्त चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांनी याला गांभीर्यानं घेतलेलं आहे, प्रत्येकाचा जीव महत्वाचा आहे. त्यामुळं अहवालात नेमकं कोण दोषी आहे, हे पाहावं लागेल. राजीनामा दिला बरोबर आहे. एखाद्यावेळी आरोप झाले म्हणून राजीनामा दिला जातो, मात्र ते आरोप सिद्ध व्हायला हवेत ना? अमित गोरखे याबाबत जास्त जाणून आहे. तो माझ्यासह मुख्यमंत्र्यांशी ही बोलला आहे. त्याच्या पीएच्या पत्नीला न्याय मिळवून देण्यासाठी सगळे प्रयत्नशील आहेत,” असं अजित पवार म्हणाले.