मालाड येथे भव्य क्रिएटिव्ह स्पेसचा विकास होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मालाड येथील माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या (INB) अखत्यारितील जवळपास २४० एकर जागेत भव्य क्रिएटिव्ह स्पेसचा विकास केला जाईल. या योजनेत केंद्र आणि राज्य शासन एकत्र येऊन को-क्रिएशन मॉडेलद्वारे काम करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.
आज मुंबईतील बांद्रा-कुर्ली कॉम्पलेक्स येथील जिओ कन्व्हेंन्शन सेंटर येथील वेव्हज् २०२५ निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. यावेळी माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव, मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबईला वर्ल्ड एंटरटेनमेंट कॅपिटल बनवण्याचं स्वप्न सत्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या या पुढाकारामुळे भारतातील नव्हे तर जागतिक पातळीवरील क्रिएटिव्ह इंडस्ट्रीसाठी मुंबई एक हब ठरणार आहे. पोस्ट प्रॉडक्शन, स्टुडिओज, फिल्म टेक्नोलॉजी, अॅनिमेशन आणि व्हिज्युअल इफेक्ट्ससारख्या आधुनिक सेवा आणि अभ्यासाचे वर्ल्ड क्लास सेंटर इथे उभारले जाणार आहे. या प्रकल्पांमुळे मुंबईचं स्थान केवळ देशातच नव्हे, तर जगात एंटरटेनमेंट इंडस्ट्रीतील प्रमुख केंद्र म्हणून बळकट होणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी व्यक्त केला.