संजय गांधी नगरमधून अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई
अमरावती: शुक्रवारी (११ एप्रिल २०२५) सकाळी ११:३० वाजता झोन क्रमांक ३ अंतर्गत येणाऱ्या संजय गांधी नगर नं. १ फॉरेस्ट कॉलनी परिसरात अमरावती महापालिकेने मोठी अतिक्रमणविरोधी कारवाई राबवली. रस्त्यावरील अनधिकृत पानठेले, अंडी-मटण विक्रीच्या हातगाड्या आणि इतर लहान गाड्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारींची दखल घेत ही मोहीम हाती घेण्यात आली.
महापालिकेची कठोर कारवाई
महापालिका आयुक्त आणि उपायुक्त (प्रशासन) यांच्या स्पष्ट आदेशानंतर अतिक्रमण पथकप्रमुख श्याम चावरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली. अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी समन्वयाने परिसरातील अनधिकृत लोखंडी पानठेले, हातगाड्या आणि इतर साहित्य जप्त केले. या मोहिमेत तब्बल ३ ट्रक भर सामान जप्त करण्यात आले. अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात पुढील कायदेशीर कारवाई करण्याचेही महापालिकेने जाहीर केले आहे.
वाहतुकीस अडथळा, नागरिकांची नाराजी
संजय गांधी नगर परिसरात रस्त्यावर अनधिकृतपणे उभ्या असलेल्या गाड्यांमुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत होता. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी होती. वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने महापालिकेने अखेर कठोर पाऊल उचलले. या कारवाईमुळे रस्ते मोकळे झाले असून, वाहतूक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.
पुढील कारवाईचे संकेत
अतिक्रमण पथकप्रमुख श्याम चावरे यांनी सांगितले की, शहरातील इतर भागांमध्येही अशा अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाई सुरू राहील. “नागरिकांच्या सोयीसाठी आणि शहराच्या सुशोभीकरणासाठी अतिक्रमणमुक्त रस्ते आवश्यक आहेत. यापुढेही अशा मोहिमा नियमित राबवल्या जातील,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या कारवाईने संजय गांधी नगर परिसरातील वाहतूक आणि स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाली असून, महापालिकेच्या या पावलाने नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे.