अमरावतीत सामूहिक गदापूजनाने हनुमान जयंती साजरी

अमरावती: हनुमान जयंतीच्या पवित्र निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अमरावती जिल्ह्यात भव्य सामूहिक गदापूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. “रामराज्याची प्रेरणा आणि हनुमान भक्तीचा जागर” या संकल्पनेसह आयोजित या कार्यक्रमाने शंखनाद, स्तोत्र पठण आणि रामनामाच्या जयघोषाने संपूर्ण वातावरण पवित्र केले.
अयोध्येतील श्रीराम मंदिराची स्थापना ही रामराज्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल मानत, हिंदु जनजागृती समितीने देशभरात शेकडो ठिकाणी सामूहिक गदापूजनाचे आयोजन केले. अमरावती जिल्ह्यात बंडेश्वर भद्रा हनुमान मंदिर, कोंडेश्वर रोडसह एकूण पाच मंदिरांमध्ये हे पूजन पार पडले. विशेष म्हणजे, या कार्यक्रमात युवकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाची सुरुवात शंखनादाने झाली, त्यानंतर सामूहिक प्रार्थना, गदापूजन विधी, श्री हनुमान आरती, मारुती स्तोत्र पठण आणि ‘श्री हनुमते नम:’ चा सामूहिक जप करण्यात आला. कार्यक्रमाच्या समारोपात रामराज्याच्या स्थापनेसाठी उपस्थित भाविकांनी सामूहिक प्रतिज्ञा घेतली. बंडेश्वर मंदिरातील पूजन परमपूज्य संत श्री बंडोजी महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी अनेक मान्यवर आणि हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.
गेल्या तीन वर्षांपासून हिंदु जनजागृती समिती हा उपक्रम यशस्वीपणे राबवत असून, यंदाही अमरावतीसह देशभरात भाविकांचा उत्साहपूर्ण सहभाग दिसून आला. या कार्यक्रमाने हनुमान भक्तीचा जागर करत रामराज्याच्या संकल्पाला बळ दिले.