धारणी तालुक्यात हनुमान जयंती उत्साहात साजरी!
धारणी : धारणी तालुक्यातील प्रत्येक गावात हनुमान जयंतीचा शुभ पर्व 12 एप्रिल 2025 रोजी मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा झाला. मंदिरांमध्ये अभिषेक, पूजन, आरत्या आणि महाप्रसादाच्या आयोजनाने वातावरण भक्तिमय झाले, तर “जय हनुमान”च्या जयघोषाने संपूर्ण तालुका दुमदुमला.
धारणी शहरातील राममंदिर, ट्रेझरी हनुमान मंदिर आणि हरीहर नगर येथील सुप्रसिद्ध हनुमान मंदिरात सकाळपासूनच भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. मंदिरांमध्ये अभिषेक, पूजन, आरती आणि हनुमान चालिसा पठणाचे कार्यक्रम पार पडले. शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. शहराबरोबरच तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांमध्येही हनुमान जयंतीचा उत्सव तितक्याच श्रद्धेने साजरा झाला.
या सोहळ्यात बालगोपाळांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. शिस्तबद्ध आयोजन, स्वच्छतेची विशेष काळजी आणि सामुदायिक सहभाग यामुळे यंदाची हनुमान जयंती विशेष ठरली. “हनुमान जयंतीच्या निमित्ताने गावकऱ्यांमधील एकता आणि भक्तीभाव अधिक दृढ झाला,” असे स्थानिकांनी सांगितले.
धारणी तालुक्यातील या भक्तिमय उत्सवाने हनुमान भक्तीचा जागर करत सर्वांना सामाजिक सौहार्दाचा संदेश दिला.