मूर्तिजापूर : ट्रॅक्टरखाली दबून वृद्ध शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू!
मूर्तिजापूर : मूर्तिजापूर तालुक्यातील भटोरी गावात शनिवारी (12 एप्रिल 2025) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास एक हृदयद्रावक अपघात घडला. यात 60 वर्षीय शेतकरी सुधाकर वामनराव ठाकरे यांचा स्वतःच्या ट्रॅक्टरखाली दबून जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
प्राप्त माहितीनुसार, सुधाकर ठाकरे (वय 60) आपला ट्रॅक्टर (क्रमांक MH30 AV 6129) चालवत शेतातून गावाकडे परतत होते. दरम्यान, अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे ट्रॅक्टरवरील ताबा सुटला आणि शेताच्या धुर्यावरून जाताना ट्रॅक्टर उलटला. यात सुधाकर ठाकरे ट्रॅक्टरखाली दबले गेले, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुंडलिक गोविंदराव कावरे यांनी मूर्तिजापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली, ज्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीधर गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंदन वानखडे आणि हवालदार गजानन सैय्यद तपास करीत आहेत.
सुधाकर ठाकरे हे मेहनती आणि प्रामाणिक शेतकरी म्हणून गावात परिचित होते. स्वतःच्या शेतसाधनामुळे त्यांचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेने भटोरी गावावर शोककळा पसरली असून, ठाकरे कुटुंबीयांच्या दु:खात संपूर्ण गाव सहभागी झाले आहे.