१४ एप्रिलला भर दुपारी उभ्या कारने घेतला पेट, ३ लाखांचे नुकसान
अमरावती: आज दुपारी विलास नगरातील पत्रकार कॉलनी परिसरात एका उभ्या कारने अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत मारुती विको (MH 27 AK 8245) या वाहनाचे सुमारे ३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाहनात गॅस असल्याने तीव्र उन्हामुळे कारने पेट घेतला. दुपारच्या सुमारे १२ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. स्थानिक रहिवासी देवानंद रामटेके यांनी तात्काळ अग्निशमन विभागाला माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे वाहन चालक सागर टपके, नितीन इंगोले आणि फायरमन अमोल साळुंके, निशांत राठोड हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले.
आगीने रौद्ररूप धारण केले होते, परंतु अग्निशमन पथकाने तत्परतेने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. फायरमन राहुल घोडे यांच्यासह संपूर्ण पथकाने आग विझवण्यात मोलाची भूमिका बजावली. काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले, परंतु तोपर्यंत वाहन पूर्णपणे जळून खाक झाले होते.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, उन्हाळ्यात वाहनांमध्ये गॅस किंवा ज्वलनशील पदार्थ ठेवण्याबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अग्निशमन विभागाने याप्रकरणी अधिक तपास सुरू केला असून, अशा घटना टाळण्यासाठी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.