दर्यापूर तालुक्यात गायवाडीत वादळाचा कहर; शेड उडून घरावर कोसळले, मोठा अनर्थ टळला

दर्यापूर – काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दर्यापूर तालुक्यातील गायवाडी गावात अचानक आलेल्या वादळाने थैमान घातले. या वादळात गावातील सामाजिक कार्यकर्ते व तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष हरिभाऊ नागे यांच्या गोदामावरील 45×15 फूट आकाराचे तीन लोखंडी शेड अँगलसहित उडाले.
उडालेल्या शेडचे अंश थेट गावातील राजीवभाऊ सवाईकार यांच्या घरावर तसेच मुख्य रस्त्यावर येऊन कोसळले. या घटनेमुळे काही काळ गावातील जनजीवन विस्कळीत झाले.
विशेष म्हणजे, केवळ 70 ते 80 मीटर अंतरावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची शोभायात्रा निघत होती. काही क्षणांच्या या घटनामुळे मोठा अनर्थ टळला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र हरिभाऊ नागे यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
तालुक्यात इतर भागांमध्ये देखील वादळाचा सौम्य प्रभाव जाणवला असून काही ठिकाणी अवकाळी पावसाचे देखील आगमन झाले. मागील काही दिवसांपासून हवामानात अचानक बदल, गडगडाट, वाऱ्याचा वेग आणि पावसाचे क्षणिक प्रमाण पाहायला मिळत आहे.
प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, हवामान विभागाकडून प्रथमच वादळ आणि पावसाच्या सूचना वेळेत देण्यात येत आहेत. स्थानिक प्रशासन व महसूल विभागाने घटनेचा आढावा घेऊन नुकसान भरपाईसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.