LIVE STREAM

Latest NewsMaharashtra

दुःखद बातमी! अधिकारी महासंघाचे संस्थापक ग.दि.कुलथे काळाच्या पडद्याआड, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याकडून श्रद्धांजली अर्पण

नवी मुंबई येथून एक दुःखद बातमी समोर आली आहे. अधिकारी महासंघाचे संस्थापक ग.दि.कुलथे हे काळाच्या पडद्याआड गेले आहेत. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग.दि.कुलथे यांचे काल (14 एप्रिल 2025) रात्री नऊ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नेरूळ, नवी मुंबई येथील राहत्या घरी दुःखद निधन झाले.

गं.दि.कुलथे हे गेल्या 50 वर्षांच्या संघटनात्मक वाटचालीत त्यांनी विक्रीकर कर्मचारी-अधिकारी संघटना, राज्य शासकीय कर्मचारी मध्यवर्ती संघटनांचे नेतृत्व करताना विविध पदांची जबाबदारी सक्षमपणे पार पाडली आहे. राज्य शासनाच्या सेवेतील तब्बल 72 खात्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या संघटनांची शिखर संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार म्हणून ते तहहयात कार्यरत होते.

ग.दि.कुलथे यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी बुनियाद को ऑ हाऊसिंग सोसायटी 2 रा मजला, सेक्टर 15, नेरूळ (पूर्व ), नवी मुंबई येथे सकाळी 9 ते 12.30 या दरम्यान ठेवण्यात येणार आहे. ग.दि.कुलथे पार्थिवावर आज दि. 15/4/2025 रोजी दुपारी 1 वा. नेरूळ स्मशानभूमी, सेक्टर-4, नेरुळ( पश्चिम), नवी मुंबई येथे अंत्यसंस्कार होतील.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवसांकडून श्रद्धांजली अर्पण
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ, राज्य शासकीय कर्मचारी-अधिकारी संघटनेच्या माध्यमातून शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर पोटतिडकीने काम करणारे नेतृत्व ग. दि. कुलथे यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर अनेकदा त्यांच्याशी चर्चा-संवाद करण्याचा प्रसंग आला. अतिशय संयमी आणि प्रशासन म्हणून राज्य सरकारचेही कुठे हित आहे, याचा जबाबदारीने विचार करणारे असेच ते नेतृत्व होते. आपल्या हक्काच्या मागण्या मांडतानाच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोणती पथ्ये पाळावीत, याचाही ते आग्रह करताना दिसत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि संघटनेतील सर्व त्यांच्या सहकाऱ्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शासन आणि अधिकारी-कर्मचारी यांच्यातील सुसंवादाचा महत्त्वाचा दुवा हरपला – अजित पवार

राज्य शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे नेते श्री. ग. दि. कुलथे यांच्या निधनानं शासन आणि अधिकारी-कर्मचारी यांच्यातील सुसंवादाचा महत्त्वाचा दुवा हरपला आहे. शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रदीर्घ काळ नेतृत्व करताना त्यांनी अनेक प्रश्न कौशल्यानं, यशस्वीपणे सोडवले. शांत, संयमी, परंतु महत्त्वाच्या मुद्द्यांवर कणखर भूमिका घेणारे नेते ही त्यांची ओळख सातत्यानं ठळक होत गेली. शासकीय सेवेतून निवृत्तीनंतरही ते कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करत राहिले. राज्य शासकीय राजपत्रित अधिकारी संघाचं त्यांनी प्रदीर्घकाळ नेतृत्व केलं.

या काळात प्रशासनात पारदर्शकता, संवेदनशीलता, जबाबदारीची भावना रुजवण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. शासकीय अधिकारी- कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचाराला बळी पडू नये, सचोटीनं वागावं, यासाठी त्यांनी प्रबोधनावर भर दिला. त्यांच्या नेतृत्वात सुरू झालेली ‘पगारात भागवा’सारखी चळवळ अनोखी ठरली. श्री. ग. दि. कुलथे यांच्या निधनानं अभ्यासू, ध्येयनिष्ठ, कर्मचारीप्रिय नेतृत्व आपण गमावलं आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पावर यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!