नोकरीसाठी 35 लाख रुपयांचा रेट, मृत शिक्षकाच्या नावावरही पैसे लाटले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शिक्षक भरती घोटाळ्याची गंभीर दखल

नागपूर : नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणात प्रशासनाला कठोर कारवाईचे आदेश दिल्याचे समजते. त्यामुळे 580 अपात्र शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होण्याची शक्यता आहे. बनावट शालार्थ आयडीद्वारे शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करुन सरकराला कोट्यवधीची चुना लावण्यात आला होता. नागपूर विभागात झालेल्या 580 शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांची चौकशी सुरु आहे. प्रत्येक बोगस नियुक्तीसाठी 20 ते 35 लाख रुपये घेण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून भरती झालेल्या बोगस शिक्षकांच्या बँक खात्यात किती पगार जमा झाला, याची तपासणीही केली जाणार आहे.
एखाद्या अधिकाऱ्याच्या सेवानिवृत्तीनंतर आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या स्वाक्षरीचा वापर बोगस नियुक्तीसाठी होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नागपुरातील 580 बोगस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीमध्ये झाल्याचा आरोप होत आहे. सोमेश्वर नैताम नावाचे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शाळांचे शिक्षणाधिकारी हे 2016 मध्ये सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर काही दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला होता. मात्र, जिल्हा परिषद आणि शिक्षण विभागातील भ्रष्ट मंडळींनी हयात नसलेल्या सोमेश्वर नैताम यांच्या बोगस स्वाक्षरीचा वापर करून 2016 ते 2024 दरम्यान 100 पेक्षा जास्त शिक्षकांची बोगस नियुक्ती केल्याचा आरोप आता होत आहे. विशेष म्हणजे सोमेश्वर नैताम हयात नसताना त्यांची बोगस स्वाक्षरी वापरून शिक्षकांची नियुक्ती बॅक डेट मध्ये म्हणजेच 2016 च्या आधीच्या कालावधीत दाखवण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांची बोगस नियुक्ती हयात नसलेल्या अधिकाऱ्याची बोगस स्वाक्षरी करून करण्यात आल्याचे गंभीर प्रकार नागपुरात घडल्याचे आरोप महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केले आहे.
शिक्षक भरती घोटाळ्यातील महत्त्वाची ऑडिओ क्लीप
नागपूर शिक्षक भरती घोटाळ्यातील मुख्य आरोपी निलेश मेश्राम याची ॲाडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. निलेश मेश्राम बोगस शिक्षक भरती प्रकरणातील कागदपत्रं तयार करणाऱ्या संबंधित व्यक्तीची ॲाडीओ क्लीप असल्याची माहिती आहे. निलेश मेश्राम यांच्या शाळा आणि संपत्ती पोलिसांच्या रडारवर आहे. निलेश मेश्राम याने नातेवाईकांच्या नावावर शिक्षण संस्था असल्याची माहिती समोर आली आहे. निलेश मेश्राम याला रविवारी नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. निलेश मेश्राम शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधीक्षक आहे
ॲाडिओ क्लीपमधील संभाषण नेमकं काय?
“निलेश भाऊ बोल, (निलेश मेश्राम म्हणतो) काल तुला फोन केला होता, (दुसरा व्यक्ती) मी दोन दिवस बाहेर होतो”
निलेश फोनवर विचारतो – “नागपूरला कधी येणार, नेऊन जा नागपूरला मला तुझ्याशी बोलायचं आहे. आपल्याला एक-दोन विषयांवर बोलायचं आहे. ते फाईल दाखवून दे, फाईल, ते पाठवायचं राहील, त्याला विचारलं तर तो म्हणे काही आलंच नाही इकडे. फाईल तुझ्याकडे आहे का, मला वाटलं पाठवून दिली, आता माझ्याकडे पैसे नाही, बघतो आज दिवसभरात”
फोनवरील दुसरा व्यक्ती “फाईल पाठवली नाही, मी आल्याशिवाय फाईल कशी येणार. आपल्याला जेवढं लेट होईल तेवढं चांगलं, मला अर्जंट 10 हजार रुपये हवे. मी एक नंबर देतोय, पाठव”