बडनेरात बाबासाहेबांची जयंती भव्य शोभायात्रेत साजरी | डीजे-ढोलात सारा शहर आनंदात

बडनेरा – बडनेरा नवी वस्ती परिसरात भारतीय बौद्ध महासभा शाखा आठवडी बाजार यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांनी अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी पंचशील ध्वजारोहणाने करण्यात आली. अध्यक्षस्थानी मच्छिंद्र भटकर (सिटी न्यूज प्रतिनिधी व महासभा अध्यक्ष) होते. प्रमुख पाहुणे म्हणून धनराज शिंदे (अमरावती महानगरपालिका उपायुक्त) आणि मेजर इंगळे यांची उपस्थिती लाभली.
सायंकाळी अशोक स्तंभापासून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. पांढऱ्या शुभ्र वस्त्रांतील बौद्ध उपासक-उपासिका, बाबासाहेबांच्या जयघोषात, ढोल-ताशे आणि डीजेच्या तालावर नृत्य करत सहभागी झाले. या शोभायात्रेमध्ये सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांनी सामील होऊन सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले.
रस्त्याच्या कडेला थंड पाण्याची, पेयांची आणि फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण कार्यक्रमासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार न घडता कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडला.