‘मुलीने स्वत:च्या इच्छेने…’; 15 वर्षीय मुलीवरील बलात्कार प्रकरणात आरोपीला मुंबई HC कडून जामीन

मुंबई हायकोर्टाने 15 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या आरोपीला जामीन मंजूर केला आहे. प्रकरणातील तथ्यांनुसार, पीडित मुलीला ती काय करत आहे याची पुरेशी जाणीव होती आणि तिने स्वत:च्या इच्छेने त्या व्यक्तीचा सहवास स्वीकारला होता. तसेच, तिच्या कुटुंबाला तिच्या आणि आरोपीच्या नात्याची माहिती होती, असं निरिक्षण कोर्टाने नोंदवलं आहे.
मे 2021 पासून तुरुंगात
न्यायमूर्ती मिलिंद एन जाधव यांच्या एकल खंडपीठाने 9 एप्रिल रोजी भारतीय दंड संहिता (आयपीसी) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्याच्या तरतुदींनुसार अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि बलात्कार केल्याच्या गुन्ह्यांसाठी गुन्हा दाखल असलेल्या 25 वर्षीय तरुणाच्या जामीन अर्जावर त्याला जामीन मंजूर करत असल्याचा आदेश दिला. या तरुणाला मे 2021 मध्ये अटक करण्यात आली होती आणि तेव्हापासून तो तुरुंगातच होता.
…म्हणून जामीन मंजूर
आरोपी गेल्या 3 वर्षे आणि 11 महिन्यांपासून कारागृहात आहे आणि “नजीकच्या भविष्यात खटला सुरू होण्याची किंवा निकाल लागण्याची शक्यता नाही. त्यामुळे त्याला जामीन मंजूर करण्यात येत आहे,” असं न्यायालयाने जामीन मंजूर करताना म्हटलं आहे.
मुलगी घरातून निघून गेली
या प्रकरणात ऑगस्ट 2020 मध्ये एफआयआर दाखल करण्यात आली होती. पीडितेच्या वडिलांनी जुलै 2020 मध्ये ती घरातून निघून गेली आणि परत आली नाही, अशी तक्रार दाखल केली होती. अर्जदाराशी (आरोपी) तिचा संबंध असल्याचा संशय आल्याने त्यांनी अर्जदाराशी संपर्क साधला, परंतु त्यांनी पीडितेच्या ठावठिकाणाबद्दल कोणतीही माहिती नसल्याचे म्हटलं होतं. मात्र दोन दिवसांनंतर, पीडितेने वडिलांना सांगितले की, ती अर्जदारासोबत दुसऱ्या राज्यातील त्याच्या मूळ गावी आहे.
15 वर्ष 3 महिन्यांची असताना गरोदर राहिली
मे 2021 मध्ये, पीडितेने (तेव्हा तिचं वय 15 वर्षे आणि 3 महिने इतकं होतं) तिच्या वडिलांना तिच्या गरोदरपणाबद्दल आणि अर्जदाराने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिल्याबद्दल सांगितले, त्यानंतर तिला महाराष्ट्रात परत आणण्यात आले. आपल्या जबाबात मुलीने म्हटले होते की, ती 2019 पासून अर्जदाराला ओळखते. त्याच वर्षी त्याने तिच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या होत्या, तिने त्याला होकारार्थी उत्तर दिले होते. तेव्हापासून ते नियमितपणे भेटत होते, जे तिच्या पालकांना मान्य नव्हते.
जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप
मुलीने असा दावा केला आहे की, आरोपीने मार्च 2020 मध्ये तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले होते. मात्र नंतर कोविडच्या साथीच्या काळात तो त्याच्या मूळ गावी गेला होता. नंतर, जुलै 2020 मध्ये महाराष्ट्राबाहेर असताना, त्या दोघांमध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले, ज्यामुळे ती गर्भवती राहिली होती.
तरुणाकडून काय युक्तिवाद करण्यात आला?
अर्जदार तरुणाचे वकील मतीन कुरेशी यांनी असा युक्तिवाद केला की, मुलगी स्वतःहून मे 2021 पर्यंत 10 महिने अर्जदारासोबत राहिली होती आणि दरम्यान, तिने अर्जदाराविरुद्ध जबरदस्ती किंवा जबरदस्तीचा कोणताही आरोप केलेला नाही. कुरेशी म्हणाले की, वडिलांना तिच्या ठिकाणाची माहिती असूनही, त्यांनी तिला ताब्यात घेण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत आणि त्यामुळे सरकारी वकिलांचा खटला ‘अत्यंत संशयास्पद’ आबे. न्यायालयाने खटल्याच्या प्रलंबित दीर्घ तुरुंगवासाचाही उल्लेख केला आणि आरोपी जामिनावर सुटण्यासाठी पात्र असल्याचे म्हटले.