अमरावती विमानतळाचं उद्घाटन: पश्चिम विदर्भाच्या प्रगतीसाठी नवे आकाशद्वार उघडले

अमरावती– अमरावती विमानतळाचं उद्घाटन केवळ एका उड्डाणाचा शुभारंभ नसून, संपूर्ण पश्चिम विदर्भासाठी प्रगतीचा नवीन वाट आहे. यापूर्वी मुंबईसारख्या महत्त्वाच्या महानगरात पोहोचण्यासाठी अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिममधील नागरिकांना नागपूरमार्गे प्रवास करावा लागत होता. मुंबईला जाण्यासाठी तब्बल 12 तास लागत होते त्यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाढत होते. आता मात्र या विमानतळामुळे अमरावतीहून थेट मुंबईला अवघ्या पावणेदोन तासांत पोहोचता येणार आहे. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या आठवड्यातील तीन दिवस नियमित विमानसेवा उपलब्ध असून, ‘उडाण’ योजनेअंतर्गत ही सेवा सर्वसामान्यांसाठीही परवडणारी ठरणार आहे. त्यामुळे प्रवासात मोठी बचत होऊन वेळेचा आणि संसाधनांचा उत्तम वापर करता येणार आहे.
या विमानतळामुळे स्थानिक आणि प्रादेशिक अर्थव्यवस्थेला मोठा बूस्ट मिळणार आहे. पर्यटन, उद्योग, व्यापार आणि शिक्षण या क्षेत्रांमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे. अमरावतीचा टेक्स्टाईल हब म्हणून विकास होत असताना, व्यापारासाठी सहज आणि जलद हवाई संपर्क हा महत्त्वाचा घटक ठरणार आहे. शिवाय, जुलैपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या फ्लाइंग ट्रेनिंग सेंटरमुळे शहराचं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्व वाढणार आहे. अमरावती विमानतळ केवळ एका जिल्ह्याचं नव्हे, तर संपूर्ण पश्चिम विदर्भाच्या विकासाचं प्रवेशद्वार ठरणार असून, याच्या माध्यमातून हजारो रोजगार संधी, नव्या गुंतवणुकीच्या शक्यता आणि एक सशक्त वाहतूक व्यवस्था निर्माण होणार आहे.
अमरावती विमानतळावर पहिल्या विमानाचे यशस्वी लँडिंग
अमरावतीकरांसाठी 16 एप्रिल 2025 हा दिवस ऐतिहासिक आहे कारण अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर अमरावती विमानतळाचं भव्य लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं. उद्घाटनादरम्यान लगेचच 72सीट्स असलेलं पहिलं एटीआर विमान विमानतळावर यशस्वीरित्या उतरलं आणि परिसरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं. उद्घाटन सोहळ्याला दोन्ही उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, महायुतीतील नेते आणि अमरावतीचे खासदार व आमदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांमध्ये पहिल्या उड्डाणाबाबत विशेष उत्सुकता दिसून आली.