भारताची पहिली चालत्या ट्रेनमधील ATM सेवा पंचवटी एक्सप्रेसमध्ये यशस्वी चाचणी

भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांच्या सोयीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलणार आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे ट्रेनने प्रवास करणाऱ्या लोकांना प्रवासादरम्यान कधीही रोख रकमेची कमतरता भासणार नाही. भारतीय रेल्वे गाड्यांमध्ये एटीएम सुविधा देण्याची योजना आखत आहे. या योजनेची चाचणी देखील यशस्वी झाली आहे. मनमाड ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसमध्ये रेल्वेने मंगळवारी एटीएमची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली. हे एटीएम ट्रेनच्या एसी कोचमध्ये बसवण्यात आले. आता असे मानले जात आहे की येत्या काळात रेल्वे अनेक गाड्यांमध्ये एटीएम सुविधा सुरू करू शकते.
पंचवटी एक्सप्रेसमधील एटीएम चाचणी यशस्वी –
प्राप्त माहितीनुसार, पंचवटी एक्सप्रेसमधील एटीएम चाचणी यशस्वी झाली आहे. तथापि, इगतपुरी आणि कसारा दरम्यानच्या नो-नेटवर्क क्षेत्रातून जात असताना, एटीएम मशीनला सिग्नल मिळाला नाही, ज्यामुळे व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की, इगतपुरी आणि कसारा दरम्यानच्या प्रवासादरम्यान, ट्रेन अनेक बोगद्यांमधून जाते, ज्यामुळे या विभागात सर्वत्र सिग्नल उपलब्ध नसतो.
प्रवाशांना आता चालत्या ट्रेनमधून पैसे काढता येणार –
भुसावळच्या डीआरएम इति पांडे यांनी सांगितलं की, चाचणीचे निकाल चांगले आले आहेत. प्रवासी आता चालत्या ट्रेनमध्येही एटीएममधून पैसे काढू शकतील. आम्ही संपूर्ण प्रवासात एटीएम मशीनच्या कामगिरीवर लक्ष ठेवत राहू.
एसी कोचमध्ये बसवण्यात आले ATM –
रेल्वेने बँक ऑफ महाराष्ट्रच्या सहकार्याने ही चाचणी घेतली.
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभाग आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांनी संयुक्तपणे पंचवटी एक्सप्रेसमध्ये एटीएमची चाचणी घेतली. विशेष म्हणजे एसी कोचमध्ये बसवलेले हे एटीएम ट्रेनमधील सर्व प्रवासी वापरू शकतात, कारण या ट्रेनचे सर्व 22 कोच वेस्टिब्यूलद्वारे एकमेकांशी जोडलेले आहेत.
लवकर इतर रेल्वे गाड्यांमध्ये देखील मिळणार ATM सुविधा –
दरम्यान, रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, जर ऑनबोर्ड एटीएम सुविधेची मागणी आणि वापर वाढला तर ही सुविधा इतर गाड्यांमध्येही सुरू केले जाईल. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच ट्रेनमध्ये एटीएमची सुविधा उपलब्ध झाली आहे. तथापि, देशातील सर्व मोठ्या आणि लहान रेल्वे स्थानकांवर अनेक बँकांचे एटीएम बसवलेले आहेत.