Ahilyanagar Crime News: थोरल्याशी वाद, धाकल्यावर काढला राग! रॉडनं मारहाण करत तरूणाला संपवलं, अहिल्यानगर हादरलं!

अहिल्यानगर: अहिल्यानगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पूर्ववैमनस्यातून सहा जणांनी एकाच्या भावाला अमानुषपणे मारहाण करत संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील गणेश नगर (ता. राहता) येथील एका तरुणाशी असलेल्या पूर्ववैमनस्यातून सहा तरुणांनी त्याच्याच 19 वर्षाच्या भावाचं अपहरण करून लोखंडी रॉडने अमानुषपणे मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रतीक वसंत सदाफळ (वय 19 वर्षे) असे मृत तरूणाचे नाव आहे. या घटनेनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह कारमध्ये टाकून आणत सिन्नर-शिर्डी महामार्गावर सामाजिक वनीकरणाजवळ रस्त्याच्या कडेला तो फेकून देण्यात आला. सोमवारी (दि.14) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास या घटनेची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सिन्नर एमआयडीसी पोलिस ठाण्यात सहा संशयितांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
प्रतीक वसंत सदाफळ (वय 19 वर्षे) याचे शनिवारी (दि.12) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास गणेशनगर येथील निर्मळ हॉस्पीटलच्या समोरून अपहरण करण्यात आले होते. त्याला संशयितांनी सिल्व्हर रंगाच्या कारमध्ये टाकून नेलं होतं, त्यानंतर लोखंडी रॉडने त्याला बेदम मारहाण करून संपवलं होते. त्यानंतर मृतदेह कारच्या डिक्कीत टाकून सिन्नर तालुक्यातील मुसळगाव शिवारात वनीकरणात नालीच्या पायथ्याशी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने टाकून दिला होता. सोमवारी या परिसरामध्ये शेळ्या चारणाऱ्यास सकाळीच नऊ वाजण्याच्या सुमारास रस्त्याच्या कडेला मृतदेह दिसल्यानंतर त्याने मुसळगाव पोलिस पाटलांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर या घटनेची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मयत प्रतीकचा भाऊ रितेश सदाफळ याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात भावाचा खून झाल्याची फिर्याद दिली.
याप्रकरणी सहा संशयितांवर गुन्हा दाखल
पोलिसांनी रितेश सदाफळ याच्या फिर्यादीहून संशयित प्रशांत ऊर्फ बाबू जनार्दन जाधव (रा. शिर्डी), अक्षय पगारे (रा. शिर्डी), चंदू तहकीत (रा. सावळीविहीर ता. राहाता), ओमकार शैलेश रोहम (रा. राहाता), प्रवीण वाघमारे (रा. कालिकानगर, शिर्डी) व सोनू पवार (रा. सावळीविहीर ता. राहाता) या सहा संशयितांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मृताचा भाऊ रितेश सदाफळ (वय 22) आणि संशयित सहा जण आरोपी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद होते. हे सहाही जण रितेशच्या मागावर होते. त्याचा लहान भाऊ प्रतीकचे अपहरण केल्यानंतर रितेश आपोआप आपल्या समोर येईल, तिथेच त्याचा गेम करायचा असा संशयितांचा ‘प्लॅन’ होता. मात्र, रितेश त्या प्लॅनमध्ये फसला नाही, परिणामी राग अनावर झाल्याने संशयितांनी रितेशचा भाऊ प्रतीकला अमानुषपणे मारहाण करत संपवलं. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.