अकोल्याच्या महिला शेतकरीचं कमाल! 1 एकरात 2.5 लाखांचं उत्पन्न

पातूर (जि. अकोला) – अकोल्याच्या पातूर तालुक्यातील दिग्रस येथील उर्मिला जगन्नाथ शेलगावकर या महिला शेतकरीने केवळ एका एकरात कलिंगडाची लागवड करून अवघ्या ७५ दिवसांत विक्रमी अडीच लाख रुपयांचं उत्पन्न घेतले आहे. त्यांना पुढील काही दिवसांत आणखी २५ ते ३० हजार रुपयांचं उत्पन्न होण्याचा अंदाज आहे. त्यांची ही यशोगाथा पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांसाठी एक प्रेरणास्त्रोत ठरत आहे.
उर्मिला शेलगावकर या एम.ए. बी.एड. शिक्षण घेतलेल्या असूनही, नोकरीच्या मागे न लागता त्यांनी शेती व्यवसायाची वाट निवडली. त्यांनी योग्य नियोजन, नियमित पीक निरीक्षण, आंतरमशागत आणि कृषी केंद्रांमधून तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन या यशाकडे वाटचाल केली.
त्यांच्या शेतातील प्रत्येक कलिंगडाचे वजन सरासरी ६ ते ७ किलो असून, त्यामुळे बाजारात त्यांच्या उत्पादनाला मोठी मागणी आहे. व्यापाऱ्यांकडून थेट शेतात येऊन खरेदी केली जात असल्याने बाजारपेठेचा अभ्यास आणि उत्पादनाचा दर्जा हे यशाचे मुख्य कारण ठरले आहे.
या भरघोस यशामुळे प्रेरित होऊन त्यांनी आता आणखी दोन एकर क्षेत्रात कलिंगडाची लागवड सुरू केली आहे. उर्मिला यांचा हा प्रयोग केवळ महिला शेतकरीच नव्हे, तर नव्या पिढीतील तरुण शेतकऱ्यांसाठीही दिशादर्शक ठरतो.