महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सुयोग्य माहिती तंत्रज्ञानाचा प्रशासनातील प्रभावी वापर’ या विषयावर आधारित सखोल प्रशिक्षण
अमरावती : राज्य शासनाच्या १०० दिवसीय विशेष उपक्रमांतर्गत अमरावती महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सुयोग्य माहिती तंत्रज्ञानाचा प्रशासनातील प्रभावी वापर’ या विषयावर आधारित सखोल प्रशिक्षण दिनांक १६ एप्रिल,२०२५ रोजी दुपारी ४.०० वाजता विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे आयोजित करण्यात आले होते.
यावेळी महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सुयोग्य माहिती तंत्रज्ञानाचा प्रशासनातील प्रभावी वापर’ या विषयावर आधारित सखोल प्रशिक्षण देण्यात आले.
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाविषयी सध्या समाजमाध्यमांवर अनेक सकारात्मक आणि नकारात्मक मतप्रवाह दिसत आहेत. मात्र, आता हे तंत्रज्ञान केवळ भविष्यातील कल्पना न राहता, प्रत्यक्ष प्रशासकीय कामकाजाचा एक आवश्यक भाग बनत आहे.
AI म्हणजे संकट नव्हे, तर तो आपला स्मार्ट सहकारी आहे जो कार्यालयीन कामकाज अधिक जलद, सुलभ आणि अचूक बनवतो. त्यामुळे प्रत्येकाने तंत्रज्ञानस्नेही होणे ही काळाची गरज आहे. AI चा योग्य वापर करून आपण आपल्या कामाची गुणवत्ता आणि परिणामकारकता निश्चितच वाढवू शकतो. तंत्रज्ञानाबद्दलचे गैरसमज दूर करून, त्याची अचूक समज घेतल्यास ते आपल्याला अधिक सक्षम बनवू शकते, असे मत महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांनी व्यक्त केले.
महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता हे भविष्यातील प्रशासनाचे बळ आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाशी परिचित करण्यात येत आहे. हे कौशल्य भविष्यातील पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख प्रशासनासाठी उपयोगी ठरेल. याशिवाय, हे प्रशिक्षण डिजिटल भारत मिशनच्या उद्दिष्टांशी सुसंगत असून, अमरावती महानगरपालिका डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने सकारात्मक पाऊल टाकत आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नव्या युगातील प्रशासनासाठी तयार ठेवणे ही काळाची गरज आहे.
महानगरपालिकेच्या नागरी सेवा सुविधांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून प्रशासन अधिक गतिमान, कार्यक्षम व नागरिक केंद्रित बनविण्याच्या दृष्टीने प्रत्येक अधिकाऱ्यांनी व कर्मचा-यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान (AI) चा वापर करावा यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणामध्ये देवेंद्र पाथरे रिजनल को-ऑर्डिनेटर (महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड), भारतेश गुप्ते असिस्टंट रिजनल को-ऑर्डिनेटर (महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड), जयेश मालविया मास्टर ट्रेनर (महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड), पवन बुरघाटे जिल्हा को-ऑर्डिनेटर (महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड) या तज्ज्ञांनी विविध उपयुक्त विषयांवर मार्गदर्शन केले. यात प्रशासनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून सेवांची गुणवत्ता, गती, पारदर्शकता आणि लोकाभिमुखता कशी वाढवता येते, याबद्दल प्रत्यक्ष उदाहरणांसह चर्चा करण्यात आली.
या प्रशिक्षणाद्वारे सहभागी अधिकाऱ्यांना व कर्मचा-यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून COPILOT, GROK AI, Neural Writer, Presenty.ai, Gamma.ai, Presentations.ai, Gemini, Runway, Adobe FireFly, Micmonster, Text Studio, Viggle, ChatGPT, Bhashini, Digilocker APIs, आणि इतर ई-गव्हर्नन्स टूल्सचे प्रशिक्षण देण्यात आले. महानगरपालिकेच्या आगामी योजनांमध्ये यापैकी अनेक साधनांचा समावेश करून नागरिकांना अधिक चांगल्या सेवा पुरवण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यामुळे अधिकारी व कर्मचारी दैनंदिन कामकाजातील अनेक प्रक्रिया उदा. नोंदी व्यवस्थापन, पत्रव्यवहार, अहवाल लेखन, नागरिकांच्या तक्रारींचे विश्लेषण अधिक जलद, अचूक आणि परिणामकारक पद्धतीने करू शकतील. चॅट जीपीटी सारखी साधने शासकीय मजकूर तयार करण्यात वेळ व कष्ट वाचवतात, तर डेटा विश्लेषण टूल्स धोरणनिर्मितीत मदत करतात. हे तंत्रज्ञान केवळ भविष्य नाही, तर आजच्या कामाचा एक भाग बनू लागले आहे. यापुढेही महानगरपालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना अशा प्रकारचे प्रशिक्षण वेळोवेळी देण्यात येणार आहे.
अमरावती महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडलेल्या या प्रशिक्षणादरम्यान अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त योगेश पिठे, उपायुक्त डॉ.मेघना वासनकर, उपायुक्त नरेंद्र वानखडे, सहाय्यक संचालक नगर रचना घनश्याम वाघाडे, शहर अभियंता ईश्वरानंद पनपालिया, मुख्यलेखापरिक्षक श्यामसुंदर देव, सिस्टीम मॅनेजर अमित डेंगरे, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, नंदकिशोर तिखिले, दिपीका गायकवाड, धनंजय शिंदे, सुभाष जानोरे, शिक्षणाधिकारी डॉ.प्रकाश मेश्राम, कार्यकारी अभियंता रविंद्र पवार, सहाय्यक नगर रचनाकार कांचन भावे, कार्यालय अधिक्षक नंदकिशोर पवार, कार्यशाळा उपअभियंता लक्ष्मण पावडे, मनपा अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर प्रशिक्षण यशस्वीकरण्याकरीता सिस्टीम मॅनेजर अमित डेंगरे, सॉफ्टवेअर अभियंता रोहन कुरील, प्रकल्प अभियंता पंकज मानवटकर, हार्डवेअर अभियंता चेतन रामटेके, संगणक विभागातील कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.