CCTV समोर: मनोरोमा दालमिलमध्ये तीन कामगारांचा मृत्यू , जबाबदार कोण?

यवतमाळ : लोहारा एमआयडीसी परिसरातील मनोरोमा जैन दालमिलमध्ये काल भीषण दुर्घटना घडली. दाळ साठवणुकीचे स्टोरेज अचानक कोसळल्याने तिघा मजुरांचा दुर्दैवी मृत्यू, तर दोन मजूर गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्यातील दृश्य अत्यंत हृदयद्रावक आहेत — मजूर अक्षरशः स्टोरेजच्या ढिगाऱ्याखाली दबले जाताना स्पष्टपणे दिसत आहेत.
दुर्घटनेने उडाली खळबळ
ही दुर्घटना घडल्यानंतर इंडस्ट्रीज डिपार्टमेंटचे डिप्युटी डायरेक्टर, कामगार विभागाचे अधिकारी आणि पोलीस यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. घटनास्थळी कार्यरत असलेल्या इतर कामगारांची बयानं नोंदवली जात असून, प्राथमिक चौकशीला सुरुवात झाली आहे.
दालमिल मालक कोण?
दालमिलचे मालक वाघापूर येथील जैन कुटुंबीय असून, त्यांनी मनोरोमा दालमिलची स्थापना केली होती. आता या दुर्घटनेनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत —
- स्टोरेजची स्थिती नेमकी काय होती?
- सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का?
- मजुरांना योग्य सूचना दिल्या होत्या का?
- या प्रश्नांची उत्तरं तपास यंत्रणांना शोधावी लागणार आहेत.
- जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू
घटनास्थळी बचावकार्य राबवण्यात आलं असून, जखमी मजुरांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांचीही बयानं अधिकाऱ्यांकडून घेतली जात आहेत. दरम्यान, मृत्यूमुखी पडलेले मजूर स्थानिकच असल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.