अकोल्यात गुड फ्रायडेनिमित्त माउंट कार्मल चर्चमध्ये विशेष प्रार्थना
अकोला : गुड फ्रायडेच्या पवित्र दिवशी देशभरातील ख्रिश्चन बांधवांनी येशू ख्रिस्तांच्या क्रूसावरील बलिदानाची आठवण करून प्रार्थना आणि उपवास केला. अकोला येथील माउंट कार्मल चर्चमध्येही या निमित्ताने विशेष प्रार्थना सभा आणि देखाव्याचे आयोजन करण्यात आले.
गुड फ्रायडे हा ख्रिश्चन धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण आहे, जो येशू ख्रिस्तांच्या क्रूसावरील दुःखद मृत्यू आणि बलिदानाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. माउंट कार्मल चर्चच्या प्रांगणात येशू ख्रिस्तांना सुळावर चढवताना सहन कराव्या लागलेल्या यातनांचा मार्मिक देखावा सादर करण्यात आला. या देखाव्याने उपस्थित ख्रिश्चन बांधवांना येशूंच्या प्रेम, त्याग आणि बलिदानाची आठवण करून दिली.
मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव या पवित्र दिवशी चर्चमध्ये उपस्थित राहून प्रार्थना आणि विशेष चर्च सेवांमध्ये सहभागी झाले. यावेळी येशू ख्रिस्तांच्या क्रूसावरील घटनांचे स्मरण करत विश्वाला शांती आणि प्रेमाचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाने उपस्थितांना येशूंच्या शिकवणींची प्रेरणा आणि त्यांच्या बलिदानाचे महत्त्व पटवून दिले.