अमरावतीत २६ एप्रिल रोजी धनगर समाजाचा भव्य सन्मान सोहळा, पत्रकार परिषदेत दिली माहिती
अमरावती : धनगर समाजातर्फे येत्या २६ एप्रिल २०२५ रोजी अमरावती येथील पंचवटी चौकातील शिवाजी सभागृहात भव्य सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांचा जंगी सत्कार होणार आहे.
या कार्यक्रमात वाशीमचे पालकमंत्री दत्तामामा भरणे, जत विधानसभा आमदार गोपीचंद पडळकर, कर्नाळा आमदार नारायण आबा पाटील, सांगोला विधानसभा आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख आणि माळशिरस येथील आमदार उत्तमराव जाणकार यांचा विशेष सत्कार होणार आहे. याशिवाय, अमरावती लोकसभा खासदार बळवंत वानखडे, राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोन्डे, वर्धा खासदार अमर काळे आणि विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार संजय खोडके यांचाही धनगर समाजातर्फे गौरव करण्यात येणार आहे. अमरावती जिल्ह्यातील सर्व आमदारांचाही या सोहळ्यात सन्मान होणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे भूषवणार असून, धनगर समाजाचे नेते आणि मतदार वृत्तपत्राचे संपादक दिलीप एडतकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. हा सोहळा धनगर समाजाच्या एकजुटीचे आणि सामाजिक योगदानाचे प्रतीक ठरणार आहे.